बर्थ डे पार्टीवरुन मैत्रिणीसोबत घरी परतणाऱ्या युवकाविरोधात नव्या धर्मांतर विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय एसी/एसटी आणि पॉस्को कायद्यातंर्गतही युवकावर आरोप ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये ही घटना घडली. महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेश लव्ह जिहाद कायदा लागू झाला आहे.

“मी याबद्दल दंडाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मी पुन्हा एकदा बोलीन. मी माझ्या मित्राबरोबर रस्त्यावरुन चालले होते. त्या टोळक्याला आमच्यापासून काही तरी प्रॉब्लेम होता. त्यांनी माझे व्हिडिओ बनवले आणि आता लव्ह जिहाद म्हणून बोलतात. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी माझ्या स्वत:च्या मर्जीने गेले होते” असे तरुणीने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

१४ डिसेंबरला रात्री १०.३० च्या सुमारास युवती आणि युवक मित्रपरिवारातील एकाच्या बर्थ डे पार्टीवरुन घरी परतत होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांचा पाठलाग केला. त्यांना काठ्यांनी मारहाण करुन त्यांची चौकशी केली. दोघांचा धर्म वेगळा असल्याचे समजल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. युवतीसोबत असलेला तिचा मित्र मुस्लिम होता.

आणखी वाचा- धक्कादायक! सामुहिक बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर नोंदवला. आरोपी आपल्या मुलीला त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी फूस लावत होता. तिच्यासोबत लग्न करुन तिचे धर्मांतर करण्याचा उद्देश होता असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मुलीच्या वडिलांनी आता त्यांची तक्रार नाकारली आहे. पोलिसांनी सांगितले तशी आपण तक्रार नोंदवली, असे त्यांनी म्हटले आहे. “माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. तिने काय चुकीचे केले? तिला राजकारणाचा विषय का बनवले जात आहे? मुलाने आणि मुलीने एकत्र चालणे बेकायद आहे का? असा सवाल मुलीच्या वडिलांनी विचारला आहे.”

Story img Loader