Crime News : मेरठ हत्याकांडाची घटना उजेडात येऊन अवघे काही दिवस झाले असताच उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात आणखी धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. येथील एका महिलेने तिची वहिनी तिच्या भावाची हत्त्या करण्यासाठी घरी परत आल्याचा आरोप केला आहे. त्या महिलेने सांगितले की, तिच्या वहिनीने कुटुंबियांना सांगितले की ती एका उद्देशाने परत आली आहे.
उत्तर प्रदेशच्या खतौली येथील भांगेला गावातील राहाणाऱ्या अनुज शर्माने दोन वर्षांपूर्वी लोणी पोलीस स्टेशन परिसरातील फारुखनगर येथील पिंकी उर्फ सना हिच्याशी लग्न केले. त्यांच्या नात्यात तणाव सुरू होता, दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. पिंकीने गाझियाबाद पोलीस स्टेशनमध्ये अनुजविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अनुज हा पिंकीला एका आठवड्यासाठी घरी परत घेऊन येण्यासाठी तयार झाला. मात्र त्यांच्यातील वाद सुरूच राहिले.
त्यानंतर २५ मार्च रोजी पिंकीने अनुजला विष मिसळलेली कॉफी पाजल्याचा आरोप आहे. ही कॉफी पिल्याने अनुज गंभीर आजारी पडला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या उपचार घेत आहे. त्याच्या कुटुंबाने पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि पिंकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अनुजची बहीण मीनाक्षीने दावा केला आहे की, “पिंकीचे लग्नाच्या आधी दुसर्या व्यक्तीवर प्रेम होतं आणि ती त्याच्याशी सतत फोनवर बोलत होती. अनुजने आक्षेप घेतल्यानंतरही त्यांच्यातील बोलणे सुरूच राहिले. एके दिवशी अनुजला कळले की तिचे त्याच्या पुतण्याबरोबरही संबंध होते. जेव्हा तिला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने कबूल केले की तिला पूर्वी त्याच्याबद्दल भावना होत्या पण आता कोणताही संबंध असल्याचे तिने नाकारले.”
मीनाक्षीने असाही दावा केला की मध्यस्थीनंतर घरी परत आल्यानंतर पिंकीने तिच्या सासूला सांगितले की, “मी एक उद्देश घेऊन परत आले आहे.” तिला माझ्या भावाची हत्या करायची होती आणि तिने त्याच्या कॉफीमध्ये विष मिसळलं, असा आरोपही मीनाक्षीने केला आहे.
अनुज आयसीयूमध्ये असताना, पिंकी तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेल्याचेही मीनाक्षीने सांगितले. दरम्यान खतौली सर्कल ऑफिसर राम आशिष यादव यांनी सांगितले की या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.