उत्तर प्रदेशच्या झांसी येथे एका महिलेने मासिक पाळीमुळे उत्तर भारतात साजरी होणारी चैत्र नवरात्रीचे विधी पूर्ण करता आले नाहीत म्हणून स्वतःचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत महिलेचे नाव प्रियांशा सोनी (३६) असून विष प्राशन केल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रियांशा सोनी या पती मुकेश सोनी, साडेतीन वर्षांची जानवी आणि अडीच वर्षीय मानवी या दोन मुलींबरोबर राहत होत्या. दरम्यान मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांशा या नवरात्रीसाठी मनापासून तयारी करत होत्या आणि त्या या सणाची आतुरतेने वाट पाहत होत्या. पण याच्या पहिल्याच दिवशी त्यांना मासिक पाळी सुरू झाली ज्यामुळे त्यांना उपवास तर करता आला नाहीच याबरोबर पूजाही करता आली नाही. यामुळे त्या नैराश्यात गेल्या. मुकेश यांनी पत्नीला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
दरम्यान मृत महिलेच्या पतीने सांगितले की, “ती वारंवार म्हणत होती की देवी आल्यावर ती पूजा सुरू करेल. तिने मला सर्व पूजा साहित्य आणण्यास सांगितले होते, ते मी आणले. पण पहिल्याच दिवशी तिला मासिक पाळी आली आणि ती विधी करू शकली नाही. मी तिला समजावून सांगितले की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ती ते स्वीकारू शकली नाही. तिला असे वाटले की ती काहीतरू महत्त्वाचे गमावून बसली आहे.”
दुसऱ्या दिवशी जेव्हा मुकेश हे त्यांच्या दुकानात होते तेव्हा प्रियांशा यांनी विषारी द्रव्य प्यायले. हे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ त्यांना झाशी मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केल. नंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले. पण त्यांची तब्येत पुन्हा खालावली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले गेले, जेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी प्रियांशा यांच्या मृतदेहाचा ताबा घेतला आणि तो शवच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
झासी शहर पोलिस अधिकारी स्नेहा तिवारी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की, कोतवाली भागात राहाणाऱ्या महिलेने विष प्राशन केले. त्या महिलेच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केले, पण तिला वाचवता आले नाही. पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह शवच्छेदनासाठी पाठवला आहे आणि पुढील तपास केला जात आहे.