आपल्याच लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झांशी येथे ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, आरोपींनी तिला एका राजकीय नेत्याकडे नेलं आणि नंतर मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील गावात एका व्यक्तीसोबत राहण्यास भाग पाडलं. तिने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, “१८ एप्रिलला लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले असता गावातील तीन तरुणांनी अपहरण केलं. २१ एप्रिलला हे लग्न होणार होतं”.
तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झांशीत ठेवलं असा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीची इच्छा नसतानाही तिला मध्य प्रदेशातील दातिया येथे एका व्यक्तीसोबत राहण्यासाठी पाठवलं.
तरुणीने आपल्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. तरुणीने अपहरण, बलात्कार आणि विक्री केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.