आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने शुक्रवारी रात्री दिले. याबाबत सल्लामसलतीची प्रक्रिया आता संपुष्टात आली असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने सदर संकेत देण्यात आले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अन्य ज्येष्ठ नेतेही या बैठकीला हजर होते.
सल्लामसलतीची प्रक्रिया संपुष्टात आली असून आता काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले. या बेठकीला ए. के. अॅण्टनी, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, पी. चिदम्बरम आदी मंत्रीही हजर होते.
त्यापूर्वी दिग्विजय सिंग यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांशी जवळपास तीन तास चर्चा केली. त्यावेळी रेड्डी, आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिग्विजय सिंग यांच्यापुढे सविस्तर सादरीकरण केले. त्यानंतरच सिंग यांनी सल्लामसलतीची प्रक्रिया संपल्याचे जाहीर केले, असे सूत्रांनी सांगितले.
तेलंगणा समर्थक आणि विरोधक नेते राजधानीत ठाण मांडून बसले असून केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सल्लामसलतीची प्रक्रिया संपुष्टात आली असून आता काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले.
महाराष्ट्राला मिळणार नवा शेजारी?
आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने शुक्रवारी रात्री दिले.
First published on: 27-07-2013 at 05:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upa close to telangana decision andhra pradesh holds its breath