सर्वसमावेशक विकास हेच यूपीए सरकारचे धोरण असून, नव्या भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे. जात, धर्म किंवा श्रेणी या मुद्द्यांवरून कोणीही मागे राहू नये, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले. केरळमधील भूमिहिनांना जागा वाटप करण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचे उदघाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या विकासाबद्दल भाष्य केले.
सर्वसमावेशक विकास हेच यूपीए सरकारचे मध्यवर्ती धोरण असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, नव्या भारताच्या निर्मितीची माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यूपीए सरकार कटिबद्ध आहे. सर्वांना मुलभूत सुविधा पुरवून सामाजिक न्याय मिळवून देण्याचाही यूपीएचा प्रयत्न आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. अन्नसुरक्षा योजनाही सुरू करण्यात आलीये. यूपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणि ग्रामीण रोजगार हमी योजना लागू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader