गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगली रोखण्यात अपयशी ठरलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे नपुंसक असल्याची जळजळीत टीका केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी केली आहे. ते उत्तरप्रदेशातील फारुखाबाद येथील सभेत बोलत होते.
खुर्शिद म्हणतात की, “देशातील जनतेच्या दाव्यानुसार देशाचा पंतप्रधान हा बळकट आणि शक्तीशाली असावा पण, गोध्रामधील नागरिकांची तुम्ही सुरक्षा करु शकत नाही. काही जण येतात, हल्ला करून जातात आणि तुम्ही काहीच करत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या अर्थाने शक्तीशाली म्हणायचे? जातीय दंगलीतील मृत्यूमुखी पडलेल्यांना तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही नपुंसक आहात.” असेही खुर्शिद म्हणाले.
भाजपनेही खुर्शिद यांच्या टीकेला प्रत्युत्तरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निराशेतून काँग्रेस नेते अशा निरर्थक टीका करत असल्याचे म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदींवर अशा प्रकारची टीका करणे हेच राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना राष्ट्रीय बैठकीत सांगितले होते का? असा सवालही भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना टीका करताना सबुरीने वागण्याचा सल्ला दिला होता. तरीही सलमान खुर्शिद यांनी नरेंद्र मोदींवर व्ययक्तीक टीका केली आहे.
सलमान खुर्शिद यांच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधांशु मित्तल यांनी खुर्शिद स्वत:ला उच्चशिक्षीत समजतात त्यांच्या तोंडून असे शब्द निघणे हे त्यांना शोभत नाही.  राजकारणाचा दर्जा खालवण्याची कामे खुर्शिद करत असल्याचेही मित्तल म्हणाले.

Story img Loader