भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीत समावेश झाल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुका हेच नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य असल्याचे गुजरातमधील मोदींच्या निकटवर्तीय असणाऱ्या भाजप नेत्यांनी सांगितले.
सतत तीन विधानसभा निवडणुकांमधील विजय आणि गुजरातची विकासाच्या वाटेवरील दमदार पावले यामुळे नरेंद्र मोदी यांची वर्णी भाजपच्या संसदीय समितीत तसेच केंद्रीय निवडणूक कार्यकारिणीवर झाली आहे, यामुळे आपली राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची महत्त्वाकांक्षा आता मोदी यांना अधिक मोकळेपणाने मांडता येईल, असे गुजरातमधील भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
मोदी यांचे समर्थक तसेच निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अमित शहा आणि स्मृती इराणी यांचा भाजपने नव्याने जाहीर केलेल्या समितीत समावेश असल्याने मोदी यांच्यासाठी अधिक अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
मोदी हे भाजपतील सर्वात अनुभवी मुख्यमंत्री असून ते सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. स्वच्छ, कार्यक्षम आणि विकासाभिमुख शासनाचे मोदी हे प्रतीक आहेत आणि यामुळेच त्यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिली. नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यापूर्वी मोदी यांनी गेल्याच आठवडय़ात सरसंघचालक मोहन भागवत आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती.
नव्या जबाबदारीनंतर नरेंद्र मोदी आता भारतातील अन्य राज्यांचा दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी ते गुजरातच्या विकास प्रारूपावर भाष्य करणार आहेत.
गुजरात भाजपतर्फे ६ एप्रिल रोजी पक्षाच्या ३३व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अध्यक्ष राजनाथ सिंग यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, मोदी यांचे राज्यातील प्रश्नांकडे लक्ष नसल्याची टीका गुजरात काँग्रेसने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा