Bengaluru CEO Killed 4 Year Old Son Update: बंगळुरू स्थित आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठ यांच्यावर स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. गोवा पोलिसांनी सूचना यांना अटक केली असून आता त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सदर घटनेचा उलगडा झाल्यावर शवविच्छेदन अहवालानंतर बुधवारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे शवविच्छेदन अहवालानुसार, चार वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी किंवा जाड कापड ठेवून मारण्यात आले ज्यात त्याचा श्वास कोंडून गुदमरून मृत्यू झाला असे कारण समोर आले होते. तर आता या प्रकरणात सूचना यांनी आपली बाजू मांडत विचित्र कारण दिले आहे.
सुचनाने मांडली वेगळीच कहाणी..
चौकशीदरम्यान सूचना यांनी यापूर्वी आपल्या पतीसह बिघडलेल्या नात्यांविषयी सुद्धा भाष्य केले होते. २०१० मध्ये सूचना यांचं लग्न झालं होतं. २०१९ मध्ये सूचना यांना मुलगा झाला. २०२० पासून सूचना आणि पतीमध्ये वाद होऊ लागले. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. कोर्टाने सांगितलं की रविवारच्या दिवशी वडील मुलाला भेटू शकतात. मात्र पतीने मुलाला भेटू नये म्हणून या महिलेने मुलाला संपवलं आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र सूचना यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा अगोदरच तिच्या मुलाचा मृत्यू झालेला होता असा दावा त्यांनी केला आहे.
पोलिसांचा अंदाज काय?
पीटीआयने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “सूचना यांनी दिलेले कारण पोलिसांनी पटलेले नाही. पुढील तपासात मुलाच्या हत्येमागील हेतू उघड होईल, सध्या तरी पतीसह नातं बिघडल्याच्या रागात हे पाऊल उचलले असावे असा अंदाज आहे.”
तसेच गोवा पोलिसांना एका खोलीत खोकल्याच्या सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत जिथे आरोपीने मुलाची कथितपणे हत्या केली होती, हे सूचित करते की तिने त्याला औषधाचा भारी डोस दिला असावा आणि ही पूर्वनियोजित हत्या होती. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदन अहवालात मुलाचा कापडाने किंवा उशीने तोंड दाबून खून झाल्याचे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
कसा पकडला गेला सुचनाचा कट?
इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सुचना सेठ हिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊस-कीपिंग कर्मचार्यांपैकी एक जण सोमवारी अपार्टमेंट स्वच्छ करण्यासाठी गेला असताना त्याला काही रक्ताचे डाग दिसले. हॉटेल व्यवस्थापनाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कलंगुट पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
जेव्हा गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि आरोपीशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा कॉलवर तिने दावा केला की तिचा मुलगा गोव्यातील फातोर्डा येथे मित्रांबरोबर होता. तिची उत्तरे अस्पष्ट आणि संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाला कॅब कर्नाटकातील जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये, कर्नाटक पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या पिशवीत सापडला त्यावेळी तिला ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा<< डोंबिवलीत कुटुंबाला मारहाण, महिलेचे कपडे फाडले; रुग्णालयात जाऊन अश्लील शिवीगाळ; पोलीस म्हणतात..
दरम्यान, आता तिच्या अटकेनंतर, मंगळवारी गोव्यातील मापुसा शहरातील न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.