Suchana Seth Killed 4 Year Old Son Family Reaction: गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सूचना सेठला मानसोपचारासाठी एका चाचणी घेण्यास सांगितल्याचे समजतेय. सूचना हिने मुलाच्या हत्येपूर्वी कुटुंब व मित्रांसह केलेल्या चर्चेबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. बुधवारी सुचना यांच्या पतीने मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. शवविच्छेदन अहवालानुसार, चार वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी किंवा जाड कापड ठेवून मारण्यात आले ज्यात त्याचा श्वास कोंडून गुदमरून मृत्यू झाला असे कारण समोर आले आहे. तर सूचना हिने आपण खून केलेला नाही म्हणत जेव्हा हॉटेलमध्ये मला जाग आली तेव्हा त्याचा अगोदरच मृत्यू झाला होता असे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी सूचना हिचे कारण मान्य केलेले नाही व याप्रकरणात पुढील तपास सुरु आहे.
सूचना व रमण यांची रविवारची भेट घडलीच नाही पण..
प्राप्त माहितीनुसार, सुचना व रमण यांचे लग्न २०१० मध्ये झाले होते, २०१९ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. दोघांमध्ये सतत खटके उडत होते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार रमण यांना रविवारच्या दिवशी मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली होती. घटनेपूर्वी रमण यांनी सूचनाला फोन करून रविवारी मुलाला बेंगळुरू येथील घरी आणण्यास सांगितले होते. मात्र, सूचनाने आपल्या पतीची विनंती नाकारली आणि त्याऐवजी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास सांगितले.
तिच्या विनंतीनुसार, रमणने सूचनाची एका ठिकाणी दोन तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहिली तिला अनेकदा कॉल केला मात्र तिने कॉल, मेसेज आणि ईमेललाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर रमण कामानिमित्त ठरल्याप्रमाणे इंडोनेशियाला निघून गेले. या कालावधीत सूचना आपला विभक्त पती आपल्या मुलाला भेटू नये यासाठी मुलासह गोव्याला निघून गेली होती.
दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सूचना हिने तिच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगितले होते की, तिचा मुलगा तिचा नवरा व्यंकट रमणसारखा दिसतो आणि त्याच तोंड पाहिलं की नेहमी त्यांच्या बिघडलेल्या नात्याची आठवण होते. घटनेनंतर इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सूचना सेठ हिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले होते.
हे ही वाचा<< सुचना सेठचा कट कसा पकडला गेला? ४ वर्षाच्या मुलाच्या हत्येचं प्रकरण तपशीलवार जाणून घ्या
प्राप्त माहितीनुसार, सूचना ‘द माइंडफुल एआय लॅब’च्या सीईओ आहे आणि तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती एक AI एथिक्स तज्ज्ञ आणि डेटा सायंटिस्ट आहे, तिला डेटा सायन्स टीम्सचे मार्गदर्शन करण्याचा आणि स्टार्टअप्स आणि उद्योग संशोधनामध्ये मशीन लर्निंग सोल्यूशन्स स्केलिंग करण्याचा १२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.