UPI Down: देशभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय वापरून पेंमेंट करण्यासाठी शनिवारी अडचण आल्याची बाब समोर आली आहे. डाऊन डिक्टेटरनुसार सकाळी साडे अकराच्या सुमारास यूपीआय वापरताना ग्राहकांना अडचण येऊ लागली. अनेकांनी पेमेंट करताना अडचण आल्याचे नमूद केले आहे. यावेळी पेटीएम आणि गूगल पे सारख्या प्लॅटफॉर्म वापरतानाही पेमेंट करतेवेळी अडचण येत होती. गेल्या एका वर्षात यूपीआय डाऊन होण्याची ही सहावी घटना आहे.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक वापरकर्त्यांनी त्यांना पेटीएम आणि गुगल पे यासारखे अॅप वापरून पेमेंट करताना अडचण येत असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. ही तांत्रिक अडचण कधीपर्यंत दुरुस्त केली जाईल याबद्दलही माहिती देण्यात आलेली नाही.

डाउनडिटेक्टरवर तक्रारींमध्ये वाढ

विविध ऑनलाइन सेवा आणि ॲप्सच्या डाऊन किंवा बिघाड झाल्याबद्दल माहिती देणारी डाऊनडिटेक्टर (Downdetector) या बेवसाईटवर दिली जाते. यूपीआयची सेवा विस्कळीत झाल्याने डाउनडिटेक्टरवर तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या साइटनुसार दुपारी १२:०० च्या सुमारास तक्रारींची संख्या १,२०० हून अधिक झाली होती. ज्यापैकी सुमारे ६६ टक्के वापरकर्त्यांनी त्यांना पेमेंट करण्यात अडचण येत असल्याचे सांगितले. तर ३४ टक्के वापरकर्त्यांनी पैसे ट्रान्सफर करताना समस्या येत असल्याचे सांगितले .

सध्या यूपीआय वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. लोक दैनंदिन कामांसाठी जसे की लहान मोठी खरेदी, बिल पेमेंट किंवा पैसै पाठणे असा गोष्टींसाठी सर्रास यूपीआय वापरतात. पण ही सेवेत अडथळा आल्याने हजारो लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.