येथील विबग्योर हायस्कूलच्या शाळेच्या आवारात सहा वर्षांच्या मुलीवर ‘अज्ञात’ इसमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर अत्यंत संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी शाळेला घेराव घालून आपला तीव्र निषेध नोंदविला. हे कृत्य करणारे गुन्हेगार शाळेचेच कर्मचारी असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची एकमुखी मागणी पालकांनी केली. ही मुलगी शाळेचीच विद्यार्थिनी असल्यामुळे विद्यार्थीवर्गाच्या एकूणच सुरक्षेविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बंगळुरूच्या वारतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विबग्योर हायस्कूल येत असून सहा वर्षांच्या या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना १५ जुलै रोजी उघडकीस आल्याची माहिती पूर्व विभागाचे सहआयुक्त के.व्ही.शरतचंद्र यांनी दिली. सदर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले असून त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले. या घटनेची माहिती मिळताच शेकडो पालकांनी गुरुवारी शाळेच्या दिशेने धाव घेत त्या परिसराला घेरावच घातला. या संदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाचे वर्तन संवेदनाशून्य असून सदर प्रकरणाची माहिती वेळीच का दिली नाही, हे स्पष्ट करण्याची मागणी करून या कृत्यात शाळेच्याच कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. पोलिसांनी या पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही आणि काही पालकांनी शाळेत घुसून तेथील खिडक्यांच्या काचांची नासधूसही केली.
शाळेची सारवासारव
शाळेच्या व्यवस्थापनाचे प्रवक्ते रुस्तम केरावाला यांनी संतप्त पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बलात्कारप्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्याला फासावर लटकावण्यात यावे, असे सांगत तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवस्थापन पूर्ण सहकार्य करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कडक पावले उचलण्यात येतील, असे सांगून मुलांची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे केरावाला यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा