विश्व हिंदू परिषदेची यात्रा रोखण्याच्या निर्णयावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. या प्रकरणी भाजपने उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले. तर मुलायमसिंह यादव यांनी भाजपवर जातीय राजकारणाचा आरोप केला. ही यात्रा धार्मिक आहे. यात्रा रोखण्यामागे भाजप आणि समाजवादी पक्षाचे संगनमत असल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे टीकास्त्र विहिंप नेते अशोक सिंघल यांनी सोडले आहे.
मुस्लीम मतांसाठी मुलायमसिंह यादव यांनी यात्रा रोखल्याचा आरोप सिंघल यांनी केला. सिंघल यांच्यासह अनेक विहिंपच्या नेत्यांना उत्तर प्रदेश सरकारने रविवारी अटक केली होती. सोमवारी सिंघल यांची सुटका करण्यात आली. यात्रेवर बंदी आणू असे कुठलेही संकेत मुलायमसिंह किंवा त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी आपल्याला भेटीदरम्यान दिले नव्हते, असा दावा सिंघल यांनी केला. यात्रेला विनाकारण मोठी प्रसिद्धी दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कायद्याचे उल्लंघन होत असेल तर असेल तर प्रवीण तोगडिया आणि जगद्गुरु रामनंदाचार्य यांची सुटका करावी, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले. न्यायालयाने यााबाबत मंगळवारी सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले…
संसदेत पडसाद
यात्रा रोखल्याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. भाजप आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांमध्ये वादावादी झाली. भाजपने उत्तर प्रदेश सरकार बरखास्तीची मागणी केली. लोकसभेत मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारचा किल्ला लढवत भाजप घटना आणि न्यायालयाला जुमानत नसल्याचे टीकास्त्र सोडले. भाजपला दंगे घडवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला. यात्रेला जनतेने प्रतिसाद दिला नसल्याचा दावाही मुलायमसिंहांनी केला. भाजपच्या योगी आदित्यनाथ यांनी मुलायमसिंह यादव यांच्या आरोपांचे खंडन केले. उत्तर प्रदेश सरकारने संतांचा अवमान केल्याचा आरोप करीत अखिलेश यादव यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली… या सरकारच्या काळात आतापर्यंत ३० जातीय दंगे झाल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशमधील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने हातमिळवणी केल्याची टीका बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली.
२००७ ते १२ या आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत विहिंपने यात्रेला परवानगी मागितली नाही. मग आताच त्यांनी ही परवानगी कशी मागितली, असा सवाल त्यांनी करीत, सपा आणि भाजपचे हे कारस्थान असल्याचा आरोप केला.
मुस्लीम बुद्धिवंतांची टीका
अलीगड मुस्लीम विद्यापीठातील मुस्लीम बुद्धिवंतांच्या संघटनेने यात्रेवर बंदी घातल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला आहे. जातीय तणाव वाढवण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप ‘फोरम ऑफ मुस्लिम स्टडीज अॅण्ड अॅनेलिसिस’ या संघटनेचे सचिव जसिम मोहम्मद यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा