केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुधवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी विरोधकांनी एकजुटीने साध्वी निरंजन ज्योती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करीत घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करावे लागले. दरम्यान, सरकारने विरोधकांची मागणी फेटाळून लावत साध्वी निरंजन ज्योती यांनी घडल्याप्रकाराबद्दल माफी मागितली असल्यामुळे हा विषय संपल्याचे स्पष्ट केले.
बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस यांच्यासह डाव्या पक्षाच्या खासदारांनी या वक्तव्याचा विषय उपस्थित करीत साध्वी निरंजन ज्योती यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. राज्यसभेमध्ये सर्वच विरोधकांनी अध्यक्षांसमोरील रिकाम्या जागेत जमून घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेमध्येही प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधकांनी हाच मुद्दा उपस्थित केला आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच प्रश्नोत्तराचा तास सुरूच ठेवला. मात्र, विरोधकांनी घोषणाबाजी कायम ठेवल्यामुळे त्यांनीही सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
दरम्यान, संसदीय कामकाजमंत्री वैंकय्या नायडू यांनी साध्वी निरंजन ज्योती यांनी घडल्याप्रकाराबद्दल माफी मागितल्यामुळे हा विषय संपविण्याची मागणी केली. यापूर्वी कॉंग्रेसच्या खासदाराने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात वादग्रस्त शब्द वापरला होता. त्याचबरोबर तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यानेही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी संबंधित माफीनाम्यानंतर हा विषय संपविण्यात आला होता, असा दाखला नायडू यांनी यावेळी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा