चंडीगड : सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात मूसेवाला यांचा मृत्यू झाला.

मूसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेडय़ात जीपमधून जात असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्या शरीरात अनेक गोळय़ा शिरल्याचे मानसाचे पोलीस उपअधीक्षक गोिबदर सिंग यांनी सांगितले.

मूसेवाला यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती मानसाचे सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी पत्रकारांना दिली.

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मानसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती व ‘आप’चे डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा पराभव केला होता. पंजाब विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी मूसेवाला यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मूसेवाला यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला असून, त्यांची सुरक्षा काढून घेतल्याबद्दल ‘आप’ सरकारवर हल्ला चढवला आहे.

 ‘पंजाबमधील काँग्रेसचे उमेदवार आणि प्रतिभावंत गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या हे काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहे. त्यांचे कुटुंब, चाहते व मित्र यांच्याप्रति आमच्या शोकसंवेदना आहेत’, असे ट्वीट काँग्रेसने केले. मूसेवाला यांना काँग्रेसमध्ये आणण्यात प्रमुख भूमिका बजावणारे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमिरदर सिंग राजा वारिंग यांनी आपल्याला अतोनात दु:ख झाल्याचे सांगितले.

सुरक्षेच्या मुद्दय़ावरून मान सरकारवर टीका

‘सिद्धू मूसेवाला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शुभदीप सिंग सिद्धू यांच्यासह ४२४ जणांची सुरक्षा पंजाब पोलिसांनी शनिवारी काढून घेतली होती. इतर लोकांमध्ये अनेक माजी आमदार, तख्त दमदमा साहिब व तख्त केसगढ साहिबचे दोन जत्थेदार, डेरांचे प्रमुख, तसेच सेवेत असलेले व निवृत्त झालेले पोलीस यांचा समावेश आहे. यावरून सध्या भगवंतसिंग मान सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. या महिन्यारंभी मुख्यमंत्री मान म्हणाले होके की, पोलीस ठाण्यांत कर्मचारी नसून त्यापैकी बहुसंख्या पोलीस नेत्यांच्या घरी सुरक्षेला जुंपले गेले आहेत. आम्हाला त्यापेक्षा राज्यातील पावणेतीन कोटी लोकांची सुरक्षा अधिक महत्त्वाची वाटते.

मुख्यमंत्री मान यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार कंवल संधू यांनी टीका केली असून, ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांची नावे माध्यमांत जाहीर का केली जातात, असा सवाल केला आहे. त्यामुळे या व्यक्तींना काही हानी पोहोचल्यास माध्यमांना सहआरोपी करणार काय, असा सवालही त्यांनी विचारला होता. आप सरकार राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था काढून घेत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

Story img Loader