बुधवारी संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर “माझ्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही घडताना मी पाहिलं नाही”, असं म्हणत आपला निषेध व्यक्त केला आहे. या घटनेविरोधात आज काँग्रेसकडून दिल्लीमध्ये निदर्शनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं राज्यसभेत त्या वेळी काय घडलं? याचा व्हिडीओ समोर आला आहे. एएनआयनं हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

राज्यसभेमध्ये चर्चा सुरू असताना बुधवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली होती. पेगॅसस आणि कृषी विधेयकांप्रमाणेच अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षाच्या काही महिला खासदारांनी वेलमध्ये उतरून कागद फाडून भिरकावले. तसेच, अनेक विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी मार्शल्सकरवी एक कडंच राज्यसभेत उभं करण्यात आलं. या प्रकारावरून सरकरावर विरोधकांनी लोकशाहीची हत्या केल्याची टीका केली आहे.

 

बाहेरून लोक आणले… राहुल गांधींचा आरोप – वाचा सविस्तर

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे”, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

“ही लोकशाही आहे का?”; विधेयक मंजूर करताना मार्शल बोलवल्याने संजय राऊत संतापले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर टीका करताना आपल्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही बघितलं नसल्याचं म्हटलं आहे. “संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

 

देशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासालाच ही काळिमा असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

Story img Loader