UPSC Debarred Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीनं मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांना आयएएस म्हणून देण्यात आलेली उमेदवारी (Provisional Candidature) यूपीएससीनं रद्द केली आहे. त्याचबरोबर, इथून पुढे होणाऱ्या यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेत बसण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, त्याआधी यूपीएससीनं दिल्लीच्या पतियाला कोर्टात पूजा खेडकर यांच्याविरोधात आक्रमक युक्तिवाद केला. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यासंदर्भात उद्या म्हणजेच गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूजा खेडकर कोर्टात का?

पूजा खेडकर यांनी सेवेत निवड होताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी चुकीचे क्रीमी लेअर प्रमाणपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याशिवाय, त्यांनी किती वेळा परीक्षा दिली, याबाबतही चुकीची माहिती यूपीएससीकडे सादर केल्याचाही खुद्द यूपीएससीचा दावा आहे. यासंदर्भात पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी पतियाला कोर्टात अर्ज केला आहे.

पूजा खेडकर यांच्या अंतरिम जामीन अर्जावर पतियाला कोर्टात सुनावणी (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या अर्जावर आज झालेल्या सुनावणीत वकील बिना माधवन यांनी त्यांची बाजू मांडली. त्यापाठोपाठ दिल्ली पोलिसांकडून वकील अतुल श्रीवास्तव तर यूपीएससीकडून वरीष्ठ वकील नरेश कौशिक यांनी बाजू मांडली.

“पूजा खेडकर यांनी व्यवस्थेतील कच्च्या दुव्यांचा गैरफायदा घेतला”, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. “त्यांच्या सर्व कागदपत्रांमध्ये कुठेही हे नमूद केलेलं नाही की त्यांनी १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिली आहे. २०१८ पर्यंत त्यांनी अर्जांमध्ये नमूद केलेली त्यांची नावंही वेगवेगळी आहेत. यूपीएससीला फसवण्यासाठीच त्यांनी त्यांची नावं बदलली. त्यांनी अशी माहिती लपवली जी सादर झाली असती तर त्यांना परीक्षेला बसताच आलं नसतं. त्यांना जर जामीन मिळाला, तर त्या तपासात सहकार्य करणार नाहीत”, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांकडून श्रीवास्तव यांनी केला.

UPSC चा आक्रमक युक्तिवाद!

दरम्यान, पूजा खेडकर यांच्याकडे कागदपत्र व पात्रता निकष नसतानाही त्यांची निवड केल्याबद्दल यूपीएससीला लक्ष्य केलं जात आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर यूपीएससीकडून आक्रमक युक्तिवाद करण्यात आला. “अशा व्यक्तीकडून वापरण्यात आलेले मार्ग यूपीएससीच्या व्यवस्थेमध्ये तपासले जाऊ शकत नाहीत. आम्ही कागदपत्रं तपासू शकतो. पण त्यांनी आजच्या सुनावणीत मान्य केलं आहे की किती वेळा परीक्षा दिली, याची चुकीची माहिती त्यांनी कागदपत्रांमध्ये दिली होती”, असं UPSC चे वकील नरेश कौशिक यांनी कोर्टाला सांगितलं.

Pooja Khedkar Update: पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय, भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी!

“पूजा खेडकर यांनी फक्त यूपीएससीसमोर नियमाभंग केला नसून न्यायालयासमोरही त्यांनी नियम मोडले आहेत. त्यांनी सनदी सेवेतील संधी बेकायदेशीरपणे मिळवली आहे. त्यामुळे हा फक्त यूपीएससीच्या नियमांचा भंग नसून संपूर्ण समाजाची फसवणूक आहे. आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे माहिती असूनही त्यांनी अर्जामध्ये चुकीची माहिती भरली”, अशा शब्दांत कौशिक यांनी यूपीएससीकडून युक्तिवाद केला.

“पालकांचं नाव बदलता येत नाही, त्यांनी तेही केलं”

दरम्यान, UPSC कडून पूजा खेडकर यांनी पालकांचं नाव बदलण्यावर आक्षेप घेतला आहे. “पूजा खेडकर यांनी सांगितलं की नावात नियमानुसारच बदल करण्यात आला. हे खरं आहे, पण तुमच्या नावाचं स्पेलिंग तुम्ही कसं बदलू शकता? त्यांना पालकांचं नाव बदलण्याची परवानगी नाही. पण त्यांनी तेही केलं. त्यांनी त्यांच्या आईचं आणि वडिलांचंही नाव बदललं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी नियमभंग केले आहेत. किती हुशार व्यक्ती आहेत त्या. त्यामुळे अटकपूर्व जामीन या प्रकरणात दिला जाऊ नये”, असा युक्तिवाद UPSC कडून करण्यात आला आहे.

दरम्यान, तिन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पतियाला कोर्टानं उद्या संध्याकाळी ४ वाजता या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार असल्याचं यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc cancels pooja khedkar candidature appeal patiala court to reject interim bail plea pmw
Show comments