पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. सोनी यांचा कार्यकाळ मे २०२९मध्ये संपणार होता. प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित वादांनंतर ‘यूपीएससी’बद्दल उद्वभवलेले वाद आणि आरोप याचा या राजीनाम्याशी काहीही संबंध नाही, असे सूत्रांनी सांगितले मात्र, ‘यूपीएससी’शी संबंधित वादामुळेच सोनी यांची हकालपट्टी झाल्याचा दावा विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे.

‘मनोज सोनी यांनी पंधरवड्यापूर्वी ‘यूपीएससी’चा राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही,’ असे या सूत्रांनी सांगितले. सोनी गुजरातमधील शिक्षणतज्ज्ञ असून ते २८ जून २०१७ रोजी ‘यूपीएससी’चे सदस्य झाले, १६ मे २०२३ रोजी त्यांनी ‘यूपीएससी’चे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. सूत्रांनी सांगितले की, सोनी तेव्हा आयोगाचे प्रमुख होण्यास इच्छुक नव्हते आणि त्यांनी त्यातून बाहेर पडण्याची विनंती केली होती. मात्र, तेव्हा त्यांची विनंती मान्य केली गेली नव्हती. सोनी यांना सामाजिक-धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

पूजा खेडकरविरोधात नाव, पत्ता यासह इतर चुकीचे तपशील देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ‘यूपीएससी’ने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर सोनी यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले आहे. पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यापासून समाजमाध्यमावर भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामध्ये विशेषत: इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग (ईडब्ल्यूएस) यासंबंधी बनावट प्रमाणपत्रांचे दाव्यांचा समावेश आहे.दरम्यान, ‘यूपीएससी’शी संबंधित उद्भवलेले वाद हा देशाच्या चिंतेचा विषय असून, या वादांमुळेच सोनी बाहेर पडले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ पद्धतशीरपणे भारताच्या संस्था ताब्यात घेत आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा, सचोटी आणि स्वायत्ततेचे नुकसान करत आहेत, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी सनदी नोकरशाहीचा उल्लेख भारताची पोलादी चौकट असा केला होता, पण शासनाच्या प्रत्येक घटकावर नियंत्रण मिळवण्याच्या मोदी सरकारच्या अविचारी प्रयत्नांमुळे याच चौकटीला छिद्रे पडली आहेत.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</strong>

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc chief resigns congress alleges that the ouster was due to controversiesamy
Show comments