मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यूपीएससी परीक्षार्थीना महाराष्ट्र सदनात सात दिवस राहू देण्याचा आदेश दिल्याने या विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न सुटला असला तरी निवास जुन्या महाराष्ट्र सदनात, तर भोजन, चहा व नाश्ता नवीन महाराष्ट्र सदनात असा द्राविडी प्राणायाम मात्र त्यांना करावा लागणार आहे.
कोटय़वधींची मालमत्ता असलेले जुने महाराष्ट्र सदन २०१२ पासून निवासासाठी बंद आहे. मात्र, सदनाच्या व्यवस्थापनावर कोटय़वधींचा खर्च सुरू आहे. अतिथींसाठी सदन बंद करण्यात आल्याने सदनाचा लक्षावधी रुपयांचा महसूलही गेल्या दोन वर्षांत बुडाला. विशेष म्हणजे, जुने महाराष्ट्र सदन बंद करण्याचा निर्णय निवासी आयुक्त मलिक यांनी घेतला असल्याचे समजते. कोपर्निकस मार्गावर असलेल्या या जुन्या महाराष्ट्र सदनात भोजनाची व्यवस्था नाही. अशा ठिकाणी यूपीएससीच्या मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. तेथून कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात या विद्यार्थ्यांना चहा-नाश्ता व जेवणासाठी जावे लागणार आहे.
नवीन व जुन्या महाराष्ट्र सदनांच्या एकूण दोनशेपेक्षाही जास्त खोल्या असतानादेखील यूपीएससीच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची केवळ तीनच दिवस निवास व्यवस्था करण्यात येणार होती. जानेवारीत अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांचे काँग्रेस अध्यक्ष, महापौर आदींची निवास व्यवस्था दोन्ही महाराष्ट्र सदनात करण्यात आली होती. राजकीय नेत्यांसाठी पायघडय़ा, तर मराठी विद्यार्थ्यांची गैरसोय, अशीच महाराष्ट्र सदनाची भूमिका होती. परंतु सोमवारच्या निर्णयामुळे मराठी विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील परीक्षार्थीचा द्राविडी प्राणायाम मात्र कायम
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यूपीएससी परीक्षार्थीना महाराष्ट्र सदनात सात दिवस राहू देण्याचा आदेश दिल्याने या विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न सुटला असला तरी निवास जुन्या महाराष्ट्र सदनात,
First published on: 06-05-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam candidate has no meal facility in new maharashtra sadan