भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत आशादायक  ठरावा असा प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विचाराधीन आहे. तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका ‘स्कॅन’ करून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा आयोग गांभीर्याने विचार करीत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा यांसह अनेक पदांसाठी त्रिस्तरीय परीक्षा घेतली जाते. नुकतेच या परीक्षेच्या पद्धतीत आयोगाने काही बदल केले. तसेच काही बदलांबाबत आयोगावर टीकाही झाली होती.  आयोगाची विश्वासार्हता वाढविण्याचा तसेच, गेली काही वर्षे सातत्याने उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या मागणीचा आयोगाकडून प्रयत्न केला जात आहे. त्या दृष्टीने कार्मिक मंत्रालयाची केंद्रीय लोकसेवा आयोगाशी बोलणी सुरू असल्याची माहिती, मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
नेमके बदल कसे असतील?
पूर्वपरीक्षा ‘ऑप्टिकल मार्क रेकग्निशन’ (ओएमआर) पद्धतीने घेतली जाते. सर्वप्रथम या पूर्वपरीक्षेच्या उत्तरपत्रिका व पुढे मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकाही स्कॅन करून त्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा आयोग विचार करीत आहे.
विद्यमान पद्धती
सध्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास या उत्तरपत्रिका आयोगातर्फे विद्यार्थ्यांना मिळू शकतात, मात्र परीक्षेचे तीनही टप्पे पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतरच या उत्तरपत्रिका आयोगामार्फत खुल्या केल्या जातात. मात्र यामुळे आयोगाच्या कारभाराच्या पारदर्शकतेबाबत शंकांना वाव मिळतो. हे टाळण्यासाठी आयोगाकडून हे पाऊल उचलले जात आहे.
अडथळे
या निर्णयासाठी कार्मिक मंत्रालयाबरोबरच सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणारे केंद्रीय गृह मंत्रालय, नव सेवांशी संबंधित असलेले पर्यावरण आणि नव मंत्रालय तसेच महसुलाशी संबंधित अर्थमंत्रालय या विभागांशी बोलणी सुरू आहे.

Story img Loader