देशातील तिन्ही सैन्य दलांसाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा (२) २०२० च्या निकालांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये ४७८ जणांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे यापैकी ३२ जण हे महाराष्ट्रातील आहेत. निवड करण्यात आलेल्या ४७८ विद्यार्थ्यांपैकी अदित्य सिंह राणा याने सर्वाधिक म्हणजेच १११६ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमाकांकावर नकुल सक्सेना असून त्याने १०७७ गुण मिळवलेत. तर तिसऱ्या क्रमांकावर देवेन नामदेव शिंदे असून त्याने १०७१ गुण मिळवलेत.
निकाल कसा पहावा हे जाणून घ्या
> अधिकृत वेबसाईट असणाऱ्या upsc.gov.in ला भेट द्या.
> त्यानंतर या वेबसाईटवरील ‘National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2020, Marks of Recommended Candidates’ पर्यायावर क्लिक करा.
> या लिंकवर क्लिक केल्यानंतर समोर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पीडीएफ स्वरुपात दिसेल.
> ही यादी तुम्ही डाऊनलोड करुन पुढील कागदोपत्री पूर्ततांसाठी वापरु शकता.
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाने घेतलेल्या लेखी परीक्षा आणि अनेक मुलाखतींच्या फेऱ्यांमधील चाचण्यांनंतर हे गुण प्रदान करण्यात आले असून प्राविण्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. संरक्षण दलाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करामध्ये नवीन उमेदवार निवडण्याचं काम पाहिलं जातं.
या निकालासंदर्भात उमेदवारांना काही शंका असल्यास ते 011-23385271/ 011-23381125/ 011-23098543 या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळामध्ये फोन करुन माहिती विचारु शकतात.