जगातील अग्रगण्य परीक्षांपैकी एक असा ज्या परीक्षेचा उल्लेख केला जातो, अशी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणारी भारतीय सनदी सेवांची परीक्षा अखेरच्या क्षणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. या परीक्षेबाबत उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर तोडगा काढण्यात आला आहे आणि तब्बल नऊ लाख विद्यार्थी परीक्षेसाठी मानसिकदृष्टय़ा तयार झाले असताना आयत्यावेळी ती रद्द करता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार रविवार, २४ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार, यावर शिक्कामोर्तब झाले.
अंगेश कुमार यांनी ही परीक्षा व परीक्षा पद्धती ग्रामीण आणि इंग्रजी माध्यमाची पाश्र्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘समन्यायी’ नसल्याचा आरोप करीत ती पुढे ढकलण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुट्टीचा दिवस असूनही विशेष सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाचे न्यायाधीश जे. एस. शेखर व अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या इंग्रजी आकलनाच्या मुद्दय़ावर तोडगा निघाला असून त्याविषयी आयोगाने सूचनापत्रकही जारी केले आहे. या परीक्षेला देशातील सुमारे ९ लाख विद्यार्थी बसणार आहेत. अशी परीक्षा आयत्यावेळी पुढे ढकलता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.

Story img Loader