केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल आज (२३ मे) लागला. या परिक्षेत दरवर्षीप्रमाणे बिहारच्या पोरांनी बाजी मारली. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बिहारच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ही परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तयारी, त्याचे परिश्रम, परिक्षेसाठी केलेल्या तडजोडी या सामान्यांसाठी प्रेरणादायी गोष्टी ठरतात. अशीच काहीशी गोष्ट आहे बिहारच्या अनुनय आनंद याची. अनुनयचा देशात १८५ वा क्रमांक आहे. तो बिहारच्या मुजफ्फरपूरमधल्या सरैय्यातल्या अजीजपूर गावचा रहिवासी आहे.
अनुनयने त्याचं प्राथमिक शिक्षण मुजफ्फरपूरमधूनच पूर्ण केलं. त्यानंतर त्याने बोकारे डीपीएसमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. तो १४ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर एका मोठ्या कंपनीत काम करत होता. परंतु आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न त्याला सतावत होतं. त्यामुळे त्याने यूपीएससी करण्यासाठी नोकरी सोडून दिली.
अनुनयचे वडील मुन्ना प्रसाद बालू-गिट्टी यांचं छोटंसं दुकान आहे. तर त्याची आई रश्मी कुमारी या गृहिणी आहेत. अनुनयने न्यूज १८ हिंदीशी बोलताना सांगितलं की, हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. अनुनयचा १८५ वा क्रमांक आल्याने तो त्याच्या कामगिरीवर समाधानी नाही. कारण त्याला आयएएस अधिकारी व्हायचं आहे. १८५ व्या रँकमुळे त्याला आयपीएस व्हावं लागेल. त्यामुळे अनुनय म्हणाला मी पुन्हा एकदा ही परिक्षा देणार आहे.
हे ही वाचा >> हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र
अनुनय स्वतःच्या कामगिरीवर खूश नसला तरी त्याचे आई-वडील मात्र खूप आनंदी आहेत. अनुनयचे वडील म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे, हा आनंद शब्दात सांगता येणार नाही. आमच्या मुलाने इंजिनिअरिंग केलं तेव्हाच समजलं होतं की तो भविष्यात काहीतरी मोठं करेल, कारण तो अभ्यासात खूप हुशार होता.