यूपीएससी अभ्यासक्रमाबाबत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला प्रश्न आठवडाभरात सोडवण्यात येईल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही युपीएससी प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. युपीएससी परीक्षार्थी आंदोलकांनी अजूनही आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांनी सोमवारी युपीएससीच्या कार्यालयाबाहेर जमून निषेध केला. २० दिवस आंदोलन चालू असूनही युपीएससीने दखल घेतलेली नाही अशी टीका आंदोलकांनी केली आहे.
यूपीएससी अभ्यासक्रमाच्या प्रश्नावर चर्चा चालू आहे व तो आठवडाभरात सोडवण्यात येईल असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर या प्रश्नावर मार्ग काढण्यास सांगितल्यानंतर एक बैठक घेण्यात आली, त्यात अर्थमंत्री अरुण जेटली, कार्मिकमंत्री जितेंद्र सिंग व इतर उपस्थित होते.
एका प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, की सीसॅट म्हणजे सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टच्या अभ्यासक्रम व रचनेबाबत तीन सदस्यांची समिती आम्ही नेमली होती. ती परीक्षार्थीच्या मागण्यांवर विचार करीत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली असा यूपीएससी उमेदवारांचा आग्रह आहे.
येत्या २४ ऑगस्टला होणारी प्राथमिक परीक्षा लांबणीवर टाकणार किंवा नाही याबाबत ठोस उत्तर देण्याचे राजनाथ सिंह यांनी टाळले. यूपीएससी प्राथमिक परीक्षेला २०० गुणांचे दोन अनिवार्य पेपर आहेत. त्यांना सीसॅट १ सीसॅट २ असे म्हणतात.  
सीसॅट २ मध्ये उताऱ्याचे आकलन, व्यक्तिकौशल्ये, संदेशवहन कौशल्ये, तार्किक कारणे, विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, बौद्धिक क्षमता, आकडेमोडीची क्षमता, इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवरील प्रश्नांचा समावेश असतो. सीसॅट२ पेपरमधील प्रश्न हे प्रमाणित पातळीपेक्षा जास्त वरचे असतात असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सनदी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य व मुलाखत अशा तीन पातळय़ांवर घेतली जाते.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंग यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून, त्यात हिंदी माध्यमाचे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात असल्याने यूपीएससी प्रश्नात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सीसॅट व प्राथमिक परीक्षेचा समानतेच्या तत्त्वावर विचार करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षा हिंदीतून देतात, पण इतर भाषक विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरच्या मदतीने भाषांतर केलेल्या प्रश्नपत्रिका दिल्या जातात ते भाषांतर गोंधळात टाकणारे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा