Pooja Khedkar UPSC to Upgrade Exam System : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर या अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. अशातच यूपीएससीने त्यांची फसवणूक आणि तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. यासाठी आधार-आधारित फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन, उमेदवाराचं फेशियल रेकग्निशन व लाईव्ह आर्टिफिशियल इन्टेलिजन्स बेस्ड सीसीटीव्ही रेकग्निशन सिस्टिम आणण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे त्यांच्यावर आरोप होत असतानाच यूपीएसससीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. मात्र या प्रकरणातून यूपीएससीने मोठा धडा घेतला आहे. NEET-UG परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेही (एनटीए) ही प्रणाली स्वीकारली आहे.

हे ही वाचा >> Worlds Most Powerful Passports 2024 : जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर, सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या स्थानी, तर भारताचा क्रमांक घसरला!

दरम्यान, नवी प्रणाली सुरू करण्यासाठी यूपीएससीने तंत्रज्ञान सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. आयोगाने काढलेल्या निविदांमध्ये म्हटलं आहे की आधार-आधारित फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन, उमेदवाराचं फेशियल रेकग्निशन व लाईव्ह आर्टिफिशियल इन्टेलिजन्स बेस्ड सीसीटीव्ही रेकग्निशन सिस्टिम हवी आहे. आयोगाने म्हटलं आहे की परीक्षेचं वेळापत्रक, परीक्षेच्या ठिकाणांची तपशीलवार यादी, प्रत्येक ठिकाणी असलेल्या उमेदवारांची संख्या यूपीएससीद्वारे तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनीला दोन ते तीन आठवडे आधी प्रदान केली जाईल. तसेच यूपीएससी फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशनसह इतर गोष्टींसाठी उमेदवारांची नावं, हजेरी क्रमांक, फोटोसह इतर माहिती परीक्षेच्या सात दिवस आधी पुरवेल.

हे ही वाचा >> IAS पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ‘वायसीएम’च्या ‘त्या’ डॉक्टरांना क्लीन चिट! चौकशीत निर्दोष

पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरून वाद

पूजा खेडकर यांच्या ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्रावरून वाद चालू आहे. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी उमेदवाराच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. पूजा यांचे वडील व्यावसायिक आहेत. पुण्यातील बाणेर भागात बंगला, ऑडीसारख्या आलिशान गाड्या आणि त्यांच्या वडिलांची सांपत्तिक स्थिती लक्षात घेता ते या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरू शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने पूजा खेडकर यांच्या ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला जात आहेत.