पीटीआय, भरूच
‘शहरी नक्षलवादी’ चेहरा बदलून गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु राज्य त्यांना राज्यातील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करू देणार नाही,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला. भरूच जिल्ह्यात देशातील पहिल्या औषध निर्मिती उद्योगांच्या ‘बल्क ड्रग पार्क’ च्या पायाभरणीसोहळय़ानिमित्त ते बोलत होते. या वेळी त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली.
मोदी म्हणाले, की ‘शहरी नक्षलवादी’ नव्या स्वरूपात गुजरातमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने आपली ‘वेशभूषा’ बदलली आहे. ‘शहरी नक्षलवादी’ आमच्या भोळय़ा आणि उत्साही तरुणांची दिशाभूल करत आहे. ते येथे पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही आमच्या तरुण पिढीला वाया जाऊ देणार नाही. देशाला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांपासून आपल्या तरुणांना वाचवायचे आहे. ते ‘परकीय शक्तींचे दलाल’ आहेत. त्यांच्यापुढे गुजरात कधीही झुकणार नाही. गुजरात त्यांचा नाश करेल. २०१४ मध्ये आपण पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था जगात १०व्या क्रमांकावर होती पण आज भारत पाचव्या क्रमांकावर आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने गुजरातला लक्ष्य केले आहे. येथे निवडणुकीत यश मिळवण्यासाठी व राजकीय अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच या पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल अनेकदा गुजरात दौरा करून भेटीगाठी-सभा घेत आहेत.