जम्मू-काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू असून आता राष्ट्रीय तपासयंत्रणेला (एनआयए) या हल्ल्यामागील दहशतवाद्यांच्या रणनीतीचा अंदाज येण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय लष्करावर आतापर्यंत झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. हा हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयाच्या संकुलाजवळ असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये लपून संपूर्ण परिसराची नीट टेहळणी केली होती. एनआयएच्या सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यादरम्यान मुख्यालयातील स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये लागलेल्या आगीमुळे सर्वाधिक जवानांचा मृत्यू झाला. मुख्यालयाच्या परिसरात दोन इमारती आहेत. हल्ल्याच्यावेळी आग लागल्यानंतर कोणालाही पळून जाता येऊ नये यासाठी दहशतवाद्यांनी बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. यावरून दहशतवाद्यांना याठिकाणची सखोल माहिती असल्याचे सिद्ध होत आहे.
पाकिस्तानमध्येही उरीसारखा हल्ला करावा – आर. के. सिंह
दहशतवाद्यांनी पश्चिम दिशेकडून मुख्यालयावर हल्ला चढवला. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी पहिल्या दहशतवाद्याला पहारेकऱ्यांनी टिपले. यादरम्यान, अन्य तीन दहशतवादी सैनिकांसाठी उभारलेल्या तंबू आणि दोन इमारतींपर्यंत पोहचले. त्यानंतर चौथ्या दहशतवाद्याने अधिकाऱ्यांच्या खानावळीपर्यंत मजल मारल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
दहशतवाद्यांकडे सापडलेल्या जीपीएस यंत्रणेमुळे ते पाकिस्तानमधूनच आले होते, हे सिद्ध होऊ शकते, असे सुरक्षायंत्रणाचे म्हणणे आहे. राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेच्या (एनटीआरओ) अभियंत्यांकडून सध्या या जीपीएस यंत्रणेतून माहिती हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रीय चौकशी संस्था म्हणजे एनआयएने जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. एनआयएच्या पथकाने उरी येथे मुक्काम ठोकला असून, त्यांनी चार दहशतवाद्यांचे डीएनए नमुने गोळा केले आहेत. विविध तुरुंगातील जैशच्या कैद्यांना त्यांची छायाचित्रे दाखवून ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत. दहशतवाद्यांचे चारपैकी दोन मृतदेह हे कमरेखाली जळालेले होते.
तत्पूर्वी लष्कराने या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असून, दहशतवादी एक दिवस आधी डोंगर चढून आत आले होते व नंतर त्यांनी हल्ला केला. यात काही उणिवा राहिल्या असतील तर असे हल्ले परतवण्यासाठी सुधारणा केल्या जातील, कारण पाकिस्तानकडून घुसखोरी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा