जर जगभरातून आलेल्या गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांनी अॅपल, आयबीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरी केली नसती तर त्या कंपन्यांचे आज काय भवितव्य राहिले असे म्हणत आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डोनल्ड ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. डोनल्ड ट्रम्प यांनी सत्तेमध्ये येण्याआधी अमेरिकन नागरिकालाच नोकरी द्या आणि अमेरिकन वस्तू खरेदी करा असा नारा दिला होता. बाहेरील देशातून आलेल्या लोकांनी अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या अशी ओरड ट्रम्प यांनी निवडणुकीआधी केली होती. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी व्हिसावरील निर्बंध कठोर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पटेल बोलत होते. कोलंबिया विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका आज श्रीमंत आहे ते केवळ अमेरिकन लोकांमुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी अमेरिकेला उपलब्ध झाल्यामुळे आहे असे ते म्हणाले. खुल्या व्यापारी धोरणामुळे सर्वांची प्रगती होत असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेतील सर्वोत्तम ब्रॅंड्सच्या शाखा जगभरात आहेत त्यामुळे त्या कंपन्यांची शेअर बाजारातील किंमत अधिक असल्याचे ते म्हणाले.  जगभरातून येणाऱ्या गुणवत्तापूर्ण वस्तू आणि कर्मचाऱ्यांमुळेच आज अमेरिकन कंपन्यांची भरभराट होत आहे असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांनी उत्तर दिली. कर्जमाफी, नोटाबंदी, जीएसटी, भारतीय बॅंक व्यवस्था रुपयाचे सशक्तीकरण या विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली.

भारताबाहेर राहणाऱ्या लोकांना नोटाबंदीनंतर पैसे बदलण्यास त्रास होत आहे यावर विचारले असता ते म्हणाले यासाठी आम्ही वेळेची मर्यादा निश्चित केली होती. आरबीआय दीर्घकालासाठी ही कृती करू शकत नाही असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी का असे त्यांना विचारण्यात आले. त्यास त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. भविष्यात कुठलिही बॅंक कर्ज देण्यास तयार होणार नाही तसेच शेतकरी देखील कर्ज फेडण्यासाठी आवश्यक ती मेहनत करणार नाही असे त्यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urjit patel donald trump columbia university apple ibm