काँग्रेसच्या माजी नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. भारत जोडो यात्रा ही द्वेषाच्या विरोधात असून प्रेम आणि सद्भावना पसरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे मी या यात्रेत सहभागी होत आहे, अशी प्रतिक्रिया एका व्हिडिओद्वारे उर्मिला मातोंडकर यांनी दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात असून लवकरच श्रीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात २० जानेवारी रोजी संजय राऊत आणि आज उर्मिला मातोंडकर सहभागी झाल्या. उर्मिला मातोंडकर यांचे सासर काश्मीरमध्ये आहे. आपल्या सासरी आल्यानंतर उर्मिला मातोंडकर कश्मीरी वेशभूषेत या यात्रेत दिसल्या.

काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर

यावेळी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारीत करताना त्या म्हणाल्या की, “कडकडीत थंडीत मी आज जम्मूत आली आहे. आज राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. एक व्यक्ती, एक पक्ष आणि अनेक लोकांच्या सोबतीने ही यात्रा पुढे निघाली आहे. एक वेगळीचा ऊर्जा या यात्रेत सहभागी झालेल्यांना मिळाली आहे. त्यातूनच ही यात्रा पुढे जात राहिली. या ऊर्जेचे नाव आहे ‘भारतीयता’. खूप सारं प्रेम, बंधुता, स्नेह, विश्वास आणि सद्भावना यामध्ये आहे. हेच मूल्य आपल्या संपूर्ण देशाला जोडून ठेवते. त्याजोरावरच आपला देश इथपर्यंत आला आणि यापुढेही जाईल. मला वाटतं, जग प्रेम आणि सद्भावनेवर चालते. द्वेष आणि भीतीवर नाही. माझ्यासाठी या यात्रेचे महत्त्व राजकीय नसून सामाजिक आहे. सामाजिक मूल्यांवर चालणाऱ्या यात्रेत मी देखील सहभागी होत आहे. कारण भारतीयतेचे ज्योत आपल्या हृदयात तेवत आहे, ती तशीच राहावी.”

Story img Loader