अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी गेल्या महिन्याभरात कॅनडाच्या आरोपांबाबत अमेरिकेची भूमिका सातत्याने स्पष्ट केली आहे. कॅनडा प्रकरणाचा परिणाम अमेरिका-भारत संबंधांवरही होण्याची शक्यता त्यांनी महिन्याभरापूर्वी व्यक्त केल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे भारतातील राजदूत यामुळे गारसेटी यांच्या वक्तव्यांना मोठं महत्त्व आपोआपच प्राप्त होतं. त्यांनीच आज एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिल्लीबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईतील हवेच्या खालावत जाणाऱ्या दर्जावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही शहरांमध्ये प्रदूषणाचं वाढतं प्रमाण हवेचा दर्जा खालावण्याचं प्रमुख कारण ठरत आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यांमध्ये याच काळात शेतकऱ्यांकडून जाळला जाणारा पेंढा दिल्लीतील प्रदूषणासाठी कारणीभूत ठरल्याचा दावा केला जात आहे. तर मुंबईतील वाहनांची वाढती संख्या व वाढत्या लोकसंख्येबाबत सखोल चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता एरिक गारसेटी यांनी केलेल्या विधानामुळे दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले एरिक गारसेटी?
एरिक गारसेटी यांनी आपल्या भाषणात लॉस एंजेलिस आणि दिल्लीची तुलना केली. “२००१मध्ये मी लॉस एंजेलिसच्या पालिकेत नव्याने निवडून गेलेला ३० वर्षांचा सदस्य होतो. लॉस एंजेलिस हे अमेकेतल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. लॉस एंजेलिसचा स्वत:चा स्वतंत्र पाणी व ऊर्जा विभाग आहे. हे शहर वॉशिंग्टन डीसीपेक्षाही जुनं आहे. २००१ साली तेव्हा आम्ही लॉस एंजेलिसमध्ये काय घडत होतं, ते काळजीपूर्वक पाहात होतो”, असं गारसेटी भाषणात म्हणाले.
“दिल्लीतील आजची प्रदूषणाची स्थिती पाहाता लॉस एंजेलिसचा तेव्हाचा काळ आठवतो. तेव्हा हे शहर अमेरिकेतलं सर्वात प्रदूषित शहर होतं. तेव्हा मुलांना त्यांच्या शिक्षकांकडून बाहेर जाऊन न खेळण्याबाबत सक्त ताकीद दिली जायची. आज मी माझ्या मुलीला जेव्हा शाळेत सोडायला गेलो, तेव्हा तिचे शिक्षक तिला हेच म्हणाले”, अशा शब्दांत एरिक गारसेटी यांनी दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीवर चिंता व्यक्त केली.
“आज आपण जागतिक हवामान बदलाविषयी चर्चा करतानाच या बदलाचे रोजच्या आयुष्यावर होणारे परिणामही पाहात आहोत”, असंही ते म्हणाले.