भारतीय अमेरिकेत मोठा बदल घडवत असल्याचे भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी शुक्रवारी (२६ एप्रिल) बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या यशाचे कौतुक केले. “यश मिळाले असून आता फॉर्च्यून ५०० कंपन्यांच्या १० सीईओपैकी एकापेक्षा जास्त भारतीय आहेत, ज्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे”, असेही एरिक गार्सेटी यांनी स्पष्ट केले आहे.
एरिक गार्सेटी पुढे म्हणाले, “पूर्वी भारतीय नागरिक अमेरिकेत सीईओ होऊ शकत नव्हता. आता गंमत अशी आहे, तुम्ही भारतीय नसाल तर तुम्ही अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही. मग ते गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा स्टारबक्स असो. हे लोक आले आणि मोठा बदल झाला”, असे अमेरिकेचे राजदूत म्हणाले. ते ‘एएनआय’शी बोलत होते.
हेही वाचा : मतभेद जबाबदारीने हाताळावेत! जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत ब्लिंकन यांचे आवाहन; चीनचा सहमतीवर भर
“दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असून भारत आणि अमेरिकेतील समाजाच्या सुधारणेसाठी लोकांना तांत्रिक क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवत आहेत. तंत्रज्ञान हे आपल्याला हानी पोहोचवत नाही तर आपले संरक्षण करते”, असेही एरिक गार्सेटी यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण जगात अशी कोणतीही दोन राष्ट्र नाहीत जी एकत्रितपणे हे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. मात्र, भारत आणि अमेरिका समाजाच्या सुधारणेसाठी लोकांना तांत्रिक क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवत असल्याचे गार्सेट्टी यांनी स्पष्ट केले. एरिक गार्सेटी हे सध्या भारतातील अमेरिकेचे राजदूत आहेत.
अमेरिका भारतीय विद्यार्थ्यांची काळजी घेतो
भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या अमेरिकेत काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. त्यावर अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी प्रतिक्रिय देताना सांगितले होते की, “अमेरिका हा एक सुरक्षित देश आहे. तो भारतीय विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतो. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्वासन देताना सांगितले होते की, जेव्हा त्यांची मुले अमेरिकेत असतात तेव्हा ती आमची मुले असतात”, असे ते म्हणाले होते.