गेल्या एक वर्षांत इसिसने लीबिया, सीरिया व इराकचा ताबा घेतला असला तरी त्यांची मारक क्षमता कमी करण्यात अमेरिकेला काही प्रमाणात यश आले आहे, असा दावा अमेरिका व मित्र देशांनी केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, इसिसविरोधी मोहिमेत पूर्ण यश येण्यासाठी वेळ लागेल. काहीवेळा अमेरिका व मित्र देशांनी प्रगती केली, काही वेळा त्यांना काही पावले माघारी जावे लागले. व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले की, इराकमध्ये इसिसच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले करण्यास आता वर्ष पूर्ण झाले आहे. फालुजा, अनबार ही ठिकाणे इसिसच्या हाती पडली होती. मोसुल व तिक्रीत , किरकुक या ठिकाणीही इसिसने मुसंडी मारली. अबलिबल व बगदादपर्यंत ते आले. सिंजार पर्वतराजीला त्यांनी वेढा देऊन याझिदी लोकांचे शिरकाण करण्याची धमकी दिली. इसिसने इराकमध्ये सुन्नी, शिया, कुर्द, ख्रिश्चन, याझिदी व तुर्कमेन व शबाक लोकांवर अत्याचार केले, पण गेल्यावर्षी आम्ही इसिसची घोडदौड रोखली असून त्यांना जेरीस आणले. एकूण सहा हजार हवाई हल्ले केले.
प्रशिक्षण छावण्या, रणगाडे, वाहने यांना लक्ष्य केले. इसिसचे ३० टक्के जिहादी आम्ही गेल्या उन्हाळ्यात मारले. इसिसने १७ हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश उत्तर सीरियात गमावला आहे. सीरिया व तुर्की यांच्यातील पाचशे मैलाच्या सीमेपासून ६८ मैलांत त्यांचा संपर्क तोडला आहे. आता इसिसच्या नेतृत्वाला अमेरिका व मित्र देशांनी जेरीस आणले आहे. त्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या आहेत. त्यांना नवीन योद्धय़ांची भरती करणे अवघड केले आहे.

Story img Loader