गेल्या महिन्याभरापासून चालू असलेलं इस्रायल-हमास युद्ध अद्याप थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. जगभरातल्या देशांसह संयुक्त राष्ट्रांनीही दोन्ही बाजूची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तातडीने युद्धबंदी करण्याची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूंनी ही मागणी धुडकावून लावली असून युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं दिसत आहे. इस्रायलचं सैन्य पुढच्या ४८ तासांत गाझा शहरात शिरणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मोठी घोषणा केली असून त्यामुळे युद्धाची सर्व समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची अण्वस्रवाहू पाणबुडी मध्यपूर्वेत!
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने आज सकाळी एक्सवर (ट्विटर) आपल्या अधिकृत हँडलवरून ही घोषणा केली आहे. ५ नोव्हेंबर, अर्थात घोषणा केल्याच्या एक दिवस आधी अमेरिकेची ओहियो श्रेणीतील पाणबुडी सेंट्रल कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या पाणबुडीत अत्याधुनिक क्षेपणास्र किंवा टॉमहॉक क्रुज क्षेपणास्र वाहून नेण्याच्या क्षमता असल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे अमेरिकेचे संरक्षण सचिव अँटनी ब्लिंकेन हे मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे अमेरिकेनं उचललेलं हे पाऊल चर्चेचा विषय ठरलं आहे.
अँटनी ब्लिंकेन यांचा दौरा
इस्रायल-हमास युद्ध, इराणमुळे निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव अँटनी ब्लिंकेन सध्या मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आत्तापर्यंत त्यांनी वेस्ट बँक, टर्कीये, इराक, जॉर्डन आणि सायप्रसला भेट दिली आहे. या दौऱ्यात मध्य-पूर्वेतील तणाव कमी व्हावा यासाठी ब्लिंकेन प्रयत्न करत असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.
काय आहे ओहियो श्रेणीतील पाणबुडी?
ओहियो श्रोणीतील पाणबुड्या या अत्याधुनिक क्षेपणास्रे वाहून नेऊ शकतात. पण त्यांची अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता त्यांना खऱ्या अर्थाने शक्तीशाली बनवते. या श्रेणीतली एक पाणबुडी तब्बल २४ ट्रायडेंट टू डी ५ अण्वस्रे वाहून नेऊ शकते. समुद्र पृष्ठभागाच्या खाली बेमालूमपणे कारवाया करण्यासाठी या पाणबुड्या ओळखल्या जातात. अमेरिकेकडून अशा प्रकारे आपल्या पाणबुड्या अमुक प्रदेशात उतरल्याचं कधीही जाहीर केलं जात नाही. उलट अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या अत्यंत गोपनीय पद्धतीने हालचाली करत असतात.
काय असावा उद्देश?
दरम्यान, अमेरिकेच्या या हालचालीमागे नेमका उद्देश काय असावा? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. गाझामधील हल्ला इस्रायलनं थांबवला नाही, तर हे युद्ध इतर देशांमध्येही पसरण्याचा इशारा इराणनं दिला आहे. इराणला स्पष्ट संदेश देण्यासाठी अमेरिकेनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय इराक व सिरियामध्ये अमेरिकन गुप्तचरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळेही अमेरिकेने आपली जरब कायम करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे.