जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांच्या झालेल्या हत्येमुळे निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकताना पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे.
आपापसातील मतभेदांचे निवारण करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू राहणे आवश्यक आहे. उभय देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव हा चर्चेमुळेच निवळू शकतो यावर आमचा ठाम विश्वास आहे, त्यामुळे आशिया खंडातील या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याबरोबरच अन्य द्विपक्षीय संबंधांबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू राहिली पाहिजे, तोच योग्य मार्ग आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नूलॅण्ड यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तानदरम्यान वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू राहिल्याने उभय देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद्भवलेला तणाव निवळण्यास त्यामुळे मदत होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांततामय वातावरण पुनस्र्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा सुरू ठेवली पाहिजे, याचा पुनरुच्चार करून सोमवारी झालेल्या चर्चेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक या महिन्यात होत असून त्याचे अध्यक्षपदही पाकिस्तानच भूषवणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे वरिष्ठ अधिकारी यादरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांची तेथे भेट घेतील. मात्र आजमितीस तरी त्या वॉशिंग्टनला येऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यंची भेट घेण्याची कोणतीही शक्यता नाही, असे नूलॅण्ड यांनी स्पष्ट केले. मात्र परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत खार यांची जेव्हा चर्चा होईल, भारत-पाकिस्तानदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा