US Airstrike on Yemen Airport: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं पुढचं धोरण स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे पण इतर देशांसाठी चिंतेचे ठरणारे निर्णय घेतले आहेत. त्यात बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्यासोबतच इतर देशांवर टेरिफ लागू करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा येमेनकडे वळवला असून हुतींना नामशेष करण्यासाठी भीषण बॉम्बहल्ले सुरू केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी येमेनमध्ये आश्रयास असणाऱ्या हुती बंडखोरांचा समूळ नायनाट करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेकडून येमेनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ले सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये हुती बंडखोरांना लक्ष्य करत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, यात अनेक निरपराध नागरिकांचाही बळी जात असल्याचं दिसून येत आहे.

हुदेईदाह विमानतळावर हवाई हल्ला

भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी संध्याकाळी उशीरा अमेरिकन फायटर जेट्स विमानांनी येमेनमधील हुदेईदाह या महत्त्वाच्या विमानतळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात शक्तिशाली मिसाईल्स डागण्यात आली. त्यामुले हुदेईदाह विमानतळाचं मोठं नुकसान झालं आहे. हा हल्ला हुतींना लक्ष्य करण्यासाठी केल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, एकीकडे हुदेईदाह विमानतळ लक्ष्य होत असताना दुसरीकडे येमेनमधील इतर भागांमध्येही अशाच प्रकारचे हल्ले करण्यात आले. त्यात सादा या उत्तरेकडील प्रांतात मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक करण्यात आली. यात सहार आणि किताफ भागात मोठं नुकसान झालं. त्याचवेळी मारिब या मध्य येमेनमधील प्रांतात पाच हवाई हल्ले करण्यात आले.

हुतींचे म्होरके ठार

दरम्यान, येमेनमधील हुती बंडखोरांचे अनेक महत्त्वाचे नेते या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. यामध्ये हुती बंडखोरांच्या क्षेपणास्त्र विभागाच्या प्रमुखाचाही समावेश आहे. गाझामधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लाल समुद्रातील व्यापारी वाहतुकीवर हल्ले करण्याचा इशारा हुती बंडखोरांनी दिला होता. यानंतर अमेरिकेकडून याची गंभीर दखल घेतली गेली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती बंडखोरांना नामशेष करण्याचा इशारा दिला आहे.