सौदी अरेबियाचा पत्रकार व अमेरिकी नागरिक जमाल खशोगी याच्या खूनप्रकरणात सौदी अरेबियाच्या सत्ताधाऱ्यांना जबाबदार न ठरवण्याच्या निर्णयाचे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. सौदी अरेबियाशी असलेले धोरणात्मक संबंध तसेच कायम राहणार असून त्याला धक्का लावणार नाही कारण जगात तेलाच्या किमती कमी होणे, हे अमेरिकेच्या हिताचे आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
खशोगी याचा तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात खून झाला होता. त्याच्या खुनाचे आदेश राजपुत्र सलमान यांनीच दिले होते, खशोगी हा एकेकाळी सलमानचा मित्र होता पण नंतर तो टीकाकार बनला त्यामुळे सलमानने त्याचा काटा काढला. खशोगीच्या खुनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर संतापाची लाट आली होती. अमेरिकेने गेल्या आठवडय़ात याच घटनेवर प्रतिक्रिया म्हणून सौदी अरेबियाच्या १७ व्यक्तींवर मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन केल्याच्या प्रकरणी र्निबध घातले होते.
सौदी अरेबियाचे राजपुत्र असलेले महंमद बिन सलमान हे सत्ताधारी असून त्यांच्यावर खशोगीच्या मृत्यू प्रकरणात कारवाई करणार नाही, कारण माझ्यासाठी अमेरिकेचे हित महत्वाचे आहे. अमेरिका यापुढेही सौदी अरेबियाचा भागीदार राहील तसेच इस्रायल व इतर भागीदार देशांशी संबंधातही कुठले बदल होणार नाहीत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी सलमानला माफ केल्याचे ऐकून आपल्याला धक्काच बसला असे डेमोक्रॅटिक सिनेटर डियानी फेनस्टेन यांनी सांगितले. त्या व इतर सदस्यांनी सौदी अरेबियाला शस्त्रविक्री करण्याविरोधात विधेयक आणण्याचा इशारा दिला आहे. रशिया, चीन यांना मी फायदा मिळू देणार नाही, अमेरिकेच्या हितासाठी सौदी अरेबियाची पाठराखण करण्याचे ठरवले आहे.
सौदी अरेबियाशी काडीमोड घेतला तर तेलाच्या किमती वाढतील. सध्या त्या कमी आहेत त्या आणखी कमी कशा होतील या दिशेने प्रयत्न आहेत, असे ट्रम्प यांनी आभार प्रकट दिनाच्या सुटीसाठी फ्लोरिडाला जाताना व्हाइट हाऊस येथे वार्ताहरांना सांगितले.