Focus Edumatics Mass layoffs : तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे अमेरिकेतील शिक्षण कंपनीने हजारो कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. फोकस एज्युमॅटिक्स (Focus Edumatics) असे कंपनीचे नाव असून ही कंपनी अमेरिका बेस्ड आहे. दरम्यान या प्रकारानंतर कंपनीला भारतात चौकशीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत मोफत वाचा

दरम्यान या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी क्रांती कुमार पती यांच्याकडे याचिका सादर केली आहे आणि आरोप केला आहे की त्यांना गेल्या आठवड्याच्या अखेरीस त्यांना नोकरीहून काढून टाकण्यात आल्याचा ईमेल मिळाला. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना आदेश दिले आहेत. यानंतर आता प्रशासनाकडून कंपनीचे कामकाज आणि कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या निर्णयाची वैधता तसेच थकलेले पगार यासंबंधी बाबींची चौकशी केली जाणार आहे. कर्मचार्‍यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलनुसार कंपनी बंद करताना हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले आहे. ज्यामध्ये फील्ड स्टाफ ते वरिष्ठ कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की त्यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये कर्मचारी कोणतीही माहिती न देता गायब झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळण्यातही अडचणी येण्याची शक्यता आहे.

फोकस एज्युमॅटीक्स कर्मचार्‍यांनी असेही सांगितले की, कर्मचारी कपात ही फक्त कोईम्बतूर पर्यंतच मर्यादीत नाही, ही कंपनीचे कामकाज बंद केल्याने देशभरातील जवळपास ३,००० कर्मचार्‍यांना फटका बसला आहे.

नवीन ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी रिलिव्हींग ऑर्डर महत्त्वाची असल्याचे सांगत कर्मचारी प्रशासनाकडे मदत मागत आहेत. कर्मचाऱ्यांचे काम केल्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र तसेच थकलेले पगार देखील मिळावेत अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी दावा केला की ते दोन वर्षांपासून कंपनीत काम करत आहेत. त्यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना त्यांनी कंपनीत काम केलेल्या दिवसांचा मोबदला आणि आवश्यक कागदपत्रे मिळावीत यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us based company shuts down without notice mass layoffs at focus edumatics police to investigate rak