पीटीआय, वॉशिंग्टन/न्यूयॉर्क
अमेरिकेने भारताच्या माजी सरकारी अधिकाऱ्यावर शीख फुटिरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पुढे-मागे या हत्येचा कट होता, असे अमेरिकेने म्हटले आहे. विकास यादव (वय ३९) असे या सरकारी अधिकाऱ्याचे नाव आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने यादव याच्याविरोधात न्यूयॉर्क येथील न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहेत.
पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात यादव सहआरोपी आहे. यादव हा भारताची गुप्तचर संस्था ‘रीसर्च अँड अॅनॅलिसिस विंग’शी (रॉ) संबंधित असल्याकडे आरोपपत्रात अंगुलीनिर्देश केला आहे. पन्नू याच्या खुनासाठी सुपारी देण्याचा आरोप यादववर आहे. यादव सध्या फरारी असून, तो सध्या सरकारी नोकरीत नसल्याचा खुलासा भारताने केला आहे. यादव याच्याबरोबर निखिल गुप्तादेखील पन्नू हत्याकटात सहभागी असल्याचा आरोप आहे. झेक रिपब्लिक येथे गेल्या वर्षी निखिल गुप्ताला अटक करण्यात आली. सध्या तो अमेरिकेच्या तुरुंगात आहे.
अमेरिकेने आरोपपत्र सादर केल्यानंतर पन्नू याने न्याय विभागाचे आभार मानले आहेत. पन्नू हा ‘शीख फॉर जस्टिस’ या फुटिरतावादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारताने पन्नून आणि त्याच्या या संघटनेवर बंदी घातली आहे.