North Sentinel island : एका अमेरिकन व्यक्तीला अंदमान आणि निकोबार बेटांवरील नॉर्थ सेंटिनेल भागात प्रवेश केल्याबद्दल बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. मखाइलो विक्टोर्वोयच पॉलीकोव्ह (Mykhailo Viktorovych Polyakov) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून या २४ वर्षीय व्यक्तीला ३१ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती कोणतीही परवानगी न घेता हा व्यक्ती नॉर्थ सेंटिनेल बेटांवर गेला होता.

नेमकं घडलं काय?

२६ मार्च रोजी हा व्यक्ती पोर्ट ब्लेअर येथे पोहचला आणि कुर्मा डेरा किनाऱ्यावरून तो नॉर्थ सेंटिनेल बेटांवर गेला, असे पोलिसांनी सांगितले. २९ मार्च रोpr पहाटे सुमारे एक वाजता त्याने कुर्मा डेरा येथून बोटीने प्रवास सुरू केला. त्याने एक नारळ आणि एक कोलाचे कॅन ‘सेंटिनेलीज’ लोकांना भेट देण्यासाठी बरोबर घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

हा व्यक्ती सकाळी १० वाजता सेंटिनेल बेटाच्या ईशान्य किनाऱ्यावर पोहोचला. दुर्बिणीचा वापर करून त्याने त्या भागाचे निरीक्षण केले, पण त्याला कोणतेही रहिवासी आढळले नाहीत. तो एक तास किनाऱ्यावर थांबला आणि स्थानिक लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिट्टी वाजवत राहिला पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

तो फाच मिनिटांसाठी खाली उतरला आणि तो बरोबर घेऊन गेलेल्या भेटवस्तू त्याने किनाऱ्यावर ठेवल्या, याबरोबरच काही वाळूचे नमूने गोळा गेले आणि त्याच्या बोटीकडे परतण्यापूर्वी त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला असेही पोलिसांनी सांगितले. दुपारी एकच्या सुमारास त्याने परतीचा प्रवास सुरू केला आणि संध्याकाळी ७ वाजता तो कुर्मा डेरा समुद्रकिनार्‍यावर परतला, येथे त्याला स्थानिकांनी पहिल्याचे पोलि‍सांनी सांगितले.

पोलिसांनी काय सांगितलं?

डीजीपी एचएस धालिवाल यांनी पीटीआयला या घटनेबद्दल माहिती दिली, त्यांनी सांगितले की, “आम्ही त्याच्या आदिवासींसाठी राखीव भागाला भेट देण्याच्या उद्देशाबद्दल अधिक माहिती मिळवत आहोत. अंदमान आणि निकोबार बेटांवरील त्याच्या वास्तव्यादरम्यान त्याने आणखी कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तो पोर्ट ब्लेअर येथे कुठे राहिला याबद्दल आम्ही हॉटेल कर्मचार्‍यांची चौकशी करत आहोत.” या व्यक्तीकडून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एक फुगवून वापरता येणारी बोट आणि एक आउटबोर्ड मोटर यांचा समावेश आहे. एका स्थानिक वर्कशॉपमध्ये त्याने हे साहित्य गोळा केले होते.

पोलिसांना सांगितले की, या व्यक्तीने त्याच्या प्रवासाचे काटेकोरपणे नियोजन केले होते, तसेच त्याने समुद्रातील स्थिती, लाटा आणि कुर्मा डेरा किनार्‍यापासून प्रवासाबद्दल अभ्यास देखील केला होता. तसेच त्याच्या या समुद्रातील प्रवासासाठी त्याने जीपीएसचा वापर केला. या व्यक्तीकडे एक गोप्रो कॅमेरा आढळून आला आहे ज्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या फुटेजमध्ये तो नॉर्थ सेंटिनेल बेटावर उतरताना दिसत आहे. कोर्टात हजर केल्यानंतर या व्यक्तीला पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देण्याची ही त्याची पहिली वेळ नव्हती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही तो पोर्ट ब्लेअरला आला होता आणि फुगवता येणार्‍या कायाकचा वापर करून नॉर्थ सेंटिनेल बेटाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्याला हॉटेल कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखले होते.

या वर्षी जानेवरी महिन्यात देखील तो या बेटांवर आला होता, येथे त्याने त्याच्या बोटीसाठी मोटार मिळवण्याचा प्रयत्न केला. तो बारतांग बेटांवर गेला आणि त्याने जारवा जमातीचा (Jarawa tribe) व्हिडीओ घेतल्याचाही आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल

तिरुरचे ट्रायबल वेलफियर ऑफिसर प्रणब सरकार यांनी ओग्रब्रज पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीविरोधात फॉरेनर्स अॅक्ट, १९४६ आणि अंदमान आणि निकोबार बेटे (आदिवासी जमातींचे संरक्षण) सुधारणा रेग्युलेशन, २०१२ च्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या अटकेबद्दल गृह विभागाला माहिती देण्यात आली आहे जेणेकरून याबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकन दूतावासाला पुढील माहिती देण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

सेंटिनेलीज कोण आहेत?

सेंटिनेलीज ही अंदमान-निकोबार द्वीपकल्पातील एक जमात आहे. त्यांचा अन्य लोकांशी संपर्क नाही. पोर्टब्लेअरच्या पश्चिमेला ६४ किमीवर असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर त्यांचे वास्तव्य आहे. सरकारकडून या जमातीला विशेष संरक्षण देण्यात आले आहे. बाहेरच्या जगाशी या आदीवासी जमातीचा संबंध आलेला नाही आणि त्यांना यापूर्वी त्यांच्याकडे गेलेल्या किंवा बेटांवर उतरलेल्या लोकांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अमेरिकन मिशनरी जॉन चाऊ याने नोव्हेंबर २०२८ मध्ये सेंटिनेलीज लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, यादरम्यान त्याची हत्या झाली.