द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगाशी करून सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबतचे विधान केले. ज्यावरून देशभरात सध्या वाद सुरू आहे. तर याप्रकरणी उदयनिधी यांच्याविरोधात आता गुन्हाही दाखल झाला आहे. एकीकडे भारतात हा वाद सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेच्या एका शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंटुकी येथील लुईव्हिल शहराच्या महापौरांनी शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमहापौर बार्बरा सेक्स्टन स्मिथ यांनी महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांच्या वतीने लुईसविले येथील केंटुकीच्या हिंदू मंदिरात महाकुंभ अभिषेक सोहळ्यादरम्यान सनातन धर्म दिनाची अधिकृत घोषणा वाचून दाखवली. आध्यात्मिक गुरू चिदानंद सरस्वती, परमार्थ निकेतन, ऋषिकेशचे अध्यक्ष श्री श्री रविशंकर आणि भगवती सरस्वती, लेफ्टनंट गव्हर्नर जॅकलिन कोलमन, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ केशा डोर्सी आणि इतर अनेक आध्यात्मिक गुरू आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महाकुंभ अभिषेक सोहळ्यानिमित्त मंदिरात सात दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवसांत मंदिरात पूजा आणि होम-हवन करण्यात आले. प.पू स्वामीजी आणि पूज्य स्वाध्वी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

हेही वाचा >> सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं, उदयनिधी आणि प्रियांक खरगेंविरोधात गुन्हा दाखल

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

शनिवारी (२ सप्टेंबर) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं. तर, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचं मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे यांनी समर्थन केलं होतं.

गुन्हाही दाखल झाला

याप्रकरणी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वाद उफाळल्यानंतर काय दिलं होतं स्पष्टीकरण?

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.