US Company Lays Off 700 Workers : अमेरिकेतील Fannie Mae कंपनीनं आपल्या ७०० कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या निलंबनासाठी वेगवेगळी कारणं कंपनीकडून देण्यात आली असून त्यापैकी नैतिकतेच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने तेलुगु कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास २०० इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबनावेळी संस्थात्मक पुनर्रचना अर्थात Organisational Restructuring चं कारण देण्यात आलं आहे.

काय आहे Telugu Donation Scam?

Fannie Mae कंपनीकडून ‘मॅचिंग ग्रँट्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबवला जातो. अॅपल कंपनीनुसारच Fannie Mae कडूनही या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांनी नामांकित स्वयंसेवी संस्थेला दिलेल्या देणगीइतकी रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिली जाते. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून या सुविधेचा गैरफायदा घेण्यात आल्याचा ठपका कंपनीकडून ठेवण्यात आला आहे. यातून कंपनीचं कोट्यवधि डॉलर्सचं नुकसान झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. अॅपलमध्येही अशाच प्रकारे कंपनीची फसवणूक करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कंपनीनं जानेवारी २०२५ मध्ये निलंबित केलं होतं.

TANA संस्थेच्या नावाने लाटले कोट्यवधि रुपये!

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, काही कर्मचाऱ्यांनी TANA अर्थात तेलुगु असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या एनजीओशी हातमिळवणी करून कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका कंपनीकडून ठेवण्यात आला आहे. कंपनीनं कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी तर TANA चा प्रादेशिक उपसंचालक होता. याप्रकारच्या घोटाळ्यात TANA प्रमाणेच इतरही काही संस्था असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

काय होता APPLE मधील घोटाळा?

Fannie Mae कंपनीप्रमाणेच अॅपल कंपनीतही जानेवारी महिन्यात अशाच प्रकारचा एक घोटाळा उघड झाला होता. यात कंपनीनं १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. ‘मॅचिंग ग्रँट्स प्रोग्राम’प्रमाणेच अॅपलकडे ‘मॅचिंग गिफ्ट्स प्रोग्रॅम’ ही योजना आहे. मात्र, यातही काही कर्मचाऱ्यांनी चुकीच्या संस्थांच्या नावाने निधी वळवल्याची बाब समोर आली होती.

कंपनीच्या सहा कर्मचाऱ्यांनी एका धर्मादाय संस्थेला देणगी दिल्याचं सांगून कंपनीकडून हजारो डॉलर्सचा निधी उकळला. पण प्रत्यक्षात त्यांनी अशी कोणतीही देणगी दिलीच नव्हती, हे तपासात पुढे आलं. घोटाळ्याची रक्कम तब्बल १ लाख अमेरिकन डॉलर्सच्या घरात जाणारी होती.