तुम्हाला जर मोफत इंटरनेट मिळाले तर?. ही शक्यता आता लवकरच सत्यात उतरणार आहे. अमेरिकी कंपनी त्यासाठी प्रयत्न करत असून, अंतराळातून उपग्रहाच्या माध्यमातून जगाला मोफत वाय-फाय पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे इंटरनेटसाठी आपल्याला कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही. सध्या तरी ही शक्यता असली, तरी ती पूर्ण करण्यासाठी या कंपनीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
न्यूयॉर्कमधील ‘मीडिया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड’ (एमडीआयएफ) या संस्थेने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. शेकडो क्युब सॅटेलाइट (उपग्रह) तयार करण्यात येत असून, त्यांचे लवकरच अंतराळात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहाद्वारे इंटरनेट डाटा उपलब्ध होणार असून, कुणालाही आपल्या स्मार्टफोन वा संगणकाद्वारे या इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
सध्या जगातील ४० टक्के लोक इंटरनेटने जोडले गेलेले नाहीत. अनेक दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. मात्र या अमेरिकी कंपनीच्या प्रयत्नामुळे दुर्गम भाग, बर्फाळ प्रदेश, आफ्रिकेतील घनदाट जंगल यांपैकी कुठल्याही प्रदेशातील लोकांना इंटरनेटचा वापर करता येईल. न्यूयॉर्कपासून टोक्योपर्यंत सर्वानाच मोफत इंटरनेट वापरता येईल, अशी माहिती एमडीआयएफ या संस्थेने दिली.
अंतराळातून अवघ्या जगाला वाय-फाय
तुम्हाला जर मोफत इंटरनेट मिळाले तर?. ही शक्यता आता लवकरच सत्यात उतरणार आहे. अमेरिकी कंपनी त्यासाठी प्रयत्न करत असून, अंतराळातून उपग्रहाच्या माध्यमातून जगाला मोफत वाय-फाय पुरवण्यात येणार आहे.
First published on: 26-02-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us company to beam free wi fi to entire world from space