गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेणाऱ्या अमेरिकेतील रिपब्लिकन सदस्याने त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली असून मोदी यांचे प्रशासन  प्रामाणिक, पारदर्शी व खुले असल्याचे म्हटले आहे. अमेरिकी कंपन्यांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ते आकर्षित करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
‘पेयोरिया’ या नियतकालिकाच्या ऑपएड सदरात काँग्रेसचे रिपब्लिकन सदस्य अ‍ॅरॉन शॉक यांनी सांगितले की, फोर्ड, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या प्रमुखांची मोदी यांनी नुकतीच बैठक घेतली. या कंपन्या गुजरातमध्ये अब्जावधींची गुंतवणूक करीत आहेत, अधिक चांगल्या पद्धतीने तेथे धोरणे राबवली जात आहेत यामुळे आपण प्रभावित झालो आहोत व अमेरिकी कंपन्यांशी त्यांनी चांगले सहकार्य प्रस्थापित केले आहे. ते लिहितात की, या कंपन्यांनी भारतातील गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली कारण तेथील सरकार प्रामाणिक, पारदर्शी व खुले आहे. गुजरात सरकारने त्यांना मालवाहतुकीसाठी चांगले रस्ते देण्याची हमी दिली आहे.
असे असले तरी मार्च महिन्यात मोदी यांची भेट घेणाऱ्या शॉक यांनी मोदी यांचा नामोल्लेख मात्र टाळला आहे. गेल्या अनेक वर्षांत गुजरातची लोकसंख्या टेक्सास व कॅलिफोर्निया यांच्या एकत्र लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे व त्या राज्याने १० टक्के विकास दर गाठला आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी त्या राज्याने लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण देशालाच भ्रष्टाचाराने ग्रासले असताना गुजरातने मात्र त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्या राज्याची धोरणे पारदर्शकता वाढवणारी आहेत, लाचखोरीचे राजकारण व लालफितीचा कारभार टाळून गुंतवणुकीला पायघडय़ा घालणारी त्यांची धोरणे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये तुम्हाला अनेक यशकथा दिसत असल्या तरी देशात इतरत्र असे चित्र नाही. कंपन्यांना भ्रष्टाचाराची काळजी वाटते. बचावात्मक व्यवस्थेमुळे कंपन्या भारतात उत्पादन करायला घाबरतात, कारण त्यांना केव्हाही दंड केला जाऊ शकतो. औषध कंपन्या जीवरक्षक औषधे बाजारात आणायला घाबरतात कारण त्यांची पेंटटस संथ गतीने चालणारी न्यायव्यवस्था रद्द करू शकते, अशा शब्दात त्यांनी भारतातील व्यवस्थेवर टीका केली आहे, मात्र गुजरातचे कौतुक केले आहे.

Story img Loader