US on Gurpatwant Singh Pannu Bank Details: अमेरिकेत राहून भारतात घातपाताच्या कारवाया करण्याची धमकी देणारा गुरपतवंतसिंग पन्नू याला भारत सरकारनं वाँटेड दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. भारतातील अनेक प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी गुरुपतवंतसिंग पन्नू याचा ताबा मिळावा यासाठी मागणी केली आहे. मात्र, अद्याप भारताला पन्नूचा ताबा मिळालेला नाही. यादरम्यान, भारत सरकारने एका प्रकरणात पन्नूच्या बँक खात्याचा तपशील मिळावा अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. मात्र, ही मागणी अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. यासाठी अमेरिकेतील स्थानिक कायद्यांचं कारण पुढे केलं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
चार वर्षांपूर्वी २०२० मध्ये पंजाबच्या मोगा जिल्हाधिकारी कार्यालयावर कथित खलिस्तानी झेंडा फडकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार १४ ऑगस्ट २०२० रोजी घडला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोन अज्ञात व्यक्तींनी मोगा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रवेश करत कार्यालयावरील तिरंगा हटवून तिथे कथित खलिस्तानी झेंडा फडकावला होता. गुरुपतवंतसिंग पन्नूनं त्यावेळी अशा प्रकारे खलिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला अडीच हजार डॉलर देणार असं जाहीर केलं होतं. त्याला भुलून दोन व्यक्तींनी हा गुन्हा केल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली.
भारतात बंदी घालण्यात आलेली सिख फॉर जस्टिस या संघटनेचा म्होरक्या गुरुपतवंतसिंग पन्नूकडे अमेरिका व कॅनडा अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. या झेंडा फडकावण्याच्या प्रकरणात भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं अमेरिकेकडे गुरुपतवंतसिंग पन्नूचं बँक खातं आणि त्याचा मोबाईल क्रमांक याबाबत माहिती मागितली होती. पण अमरिकी प्रशासनानं स्थानिक कायद्याचं कारण पुढे करत ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. या गुन्ह्यासाठी अमेरिकी कायद्यात एका वर्षाहून कमी शिक्षा आहे. त्यामुळे त्याची माहिती आपण मागवू शकत नाही, अशी भूमिका अमेरिकन प्रशासनानं घेतली आहे.
“गुरुपतवंतसिंग पन्नूवर गुन्हे दाखल झाल्यानंतर एनआयएनं अमेरिकेतील संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. यादरम्यान एनआयएला तपास करताना काही बँक खाती व फोन नंबर हाती लागले. ते गुरुपतवंतसिंग पन्नूशीच संबंधित असल्याचा एनआयएचा अंदाज आहे. त्यासंदर्भात एनआयएनं अमेरिकन प्रशासनाकडे या माहितीची मागणी केली होती”, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. याचसंदर्भात अमेरिकेकडून पन्नूची माहिती देण्यास नकार देण्यात आलेला आहे.