US F-1 Visa for Students : भारतासह जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेला जाणं आता सोपं राहिलेलं नाही. अमेरिका सातत्याने परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा नाकारत आहे. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेने विद्यार्थ्यांचे व्हिसासाठीचे अर्ज नाकारले आहेत. ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेने सर्व देशांमधून आलेल्या ४१ टक्के विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले आहेत.

दी इंडियन एक्सप्रेसने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या माहितीचं विश्लेषण केलं आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेकडे ६.९९ लाख व्हिसा अर्ज आले होते. त्यापैकी २.७९ लाख अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर, २०२२-२३ मध्ये आलेल्या ६.९९ लाख अर्जांपैकी २.५३ लाख अर्ज फेटाळण्यात आले होते.

भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा नाकारण्याचं प्रमाण अधिक?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एफ-१ व्हिसासाठी आलेल्या किंवा नाकारलेल्या देशनिहाय आर्जांची माहिती दिलेली नाही. परंतु, इंडियन एक्सप्रेसने गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी वृत्त दिले होते की २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये भारतीयांना जारी केलेल्या विद्यार्थी व्हिसाच्या संख्येत २०२३ च्या तुलनेत (पहिल्या नऊ महिन्यांमधील आकडेवारी) तब्बल ३८ टक्के घट झाली आहे. सर्व देशांमधून येणाऱ्या अर्जांची संख्या देखील कमी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

२०१४-१५ मध्ये ८.५६ लाख अर्ज प्राप्त झाले होते. पुढील काळात यामध्ये थोडी-थोडी घट होत गेली. करोनानंतर यामध्ये थोडंसं प्रमाण वाढलं होतं. मात्र आता अर्ज नाकारण्याचं प्रमाण वाढल्याने अर्ज पाठवण्याचं प्रमाण आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. २०२३-२४ मध्ये अमेरिकेने ४.०१ लाख विद्यार्थ्यांना एफ-१ व्हिसा जारी केले. तर, २०२२-२३ मध्ये ४.४५ लाख व्हिसा जाहीर करण्यात आले होते. वर्षभरात यात ४४ लाखांची घट झाली आहे.

काय आहे एफ-१ व्हिसा?

एफ-१ व्हिसा हा अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठीचा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, जो प्रामुख्याने उच्च शिक्षणासाठी (उदा. कॉलेज, विद्यापीठ, सेमिनार, किंवा इतर शैक्षणिक अभ्यासक्रम) अमेरिकेत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिला जातो. हा व्हिसामुळे विद्यार्थ्यांना कायदेशीररित्या अमेरिकेत राहण्याची आणि पूर्णवेळ अभ्यास करण्याची परवानगी मिळते. याशिवाय, काही मर्यादित अटींसह कॅम्पसवर अंशकालीन नोकरी करण्याची आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पर्यायी व्यावहारिक प्रशिक्षण (Optional Practical Training – OPT) घेण्याची संधीही मिळते.