US Deported 104 Indians to India: “तो ४० तासांचा प्रवास.. पूर्णवेळ आमच्या हातात बेड्या घातल्या होत्या. पाय बांधून ठेवले होते आणि आमच्या जागेवरून एक इंचही हलायची परवानगी नव्हती. वारंवार विनंत्या केल्यानंतर आम्हाला तसंच ओढत-फरफटत वॉशरूमला जाऊ दिलं जायचं. विमानातले कर्मचारी शौचालयाचं दार उघडायचे आणि आम्हाला आत सोडायचे”, अशा शब्दांत अमेरिकेहून भारतात परतलेल्या भारतीयांपैकी एक हरविंदर सिंग यांनी प्रवासाच्या ४० तासांमध्ये आलेले धक्कादायक अनुभव कथन केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करत असल्याचा दावा करून अमेरिकन सरकारनं १०४ भारतीयांना C-17 Globemaster या विमानातून परत पाठवलं. हे विमान बुधवारी अमृतसर येथे उतरलं. अमृतसर विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानानं चार ठिकाणी इंधन भरण्यासाठी लँडिंग केलं. या विमानातून मायदेशी परतलेले पंजाबचे हरविंदर सिंग यांनी प्रवासात या सर्व भारतीयांना दिलेल्या वागणुकीची धक्कादायक हकीगत सांगितली आहे!

काय म्हणाले हरविंदर सिंग?

पंजाबच्या होशियारपूरमधील ताहली गावात राहणारे हरविंदर सिंग हे अमेरिकेनं भारतात परत पाठवलेल्या नागरिकांच्या तुकड्यांपैकी पहिल्या तुकडीत होते. सी-१७ ग्लोबमास्टर या विमानात त्यांच्यासह एकूण १०४ भारतीय होते. पण या प्रवासाचा अनुभव हा ‘नरकाहून भयंकर’ होता, असं हरविंदर सिंग म्हणाले. “त्यांनी आम्हाला हातात बेड्या घातलेल्या अवस्थेतच बळजबरीने खायला लावलं. त्यांना वारंवार बेड्या काढण्यास सांगूनही आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. हा प्रवास फक्त शारिरीकच नाही, तर मानसिक दृष्ट्याही प्रचंड थकवणारा होता”, असं हरविंदर सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

“४० तासांत आम्हाला व्यवस्थित खायलाही मिळालं नाही. पण एका दयाळू विमान कर्मचाऱ्यानं आम्हाला काही फळं खायला दिली”, असंही हरविंदर सिंग यांनी नमूद केलं.

हरविंदर सिंग यांची कहाणी…

हरविंदर सिंग २०२४ च्या जून महिन्यात अमेरिकेला निघाले होते. पत्नी कुलजिंदर कौर यांच्याशी चर्चा करून त्यांनी निर्णय घेतला. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा आणि ११ वर्षांच्या मुलीसह कुटुंबाची गुजराण करणं हरविंदर सिंग यांच्यासाठी कठीण झालं होतं. घरचा दुधाचा व्यवसाय फारसा कामी येत नव्हता. अचानक कुठूनतरी त्यांचा एक लांबचा नातेवाईक त्यांना भेटला आणि हरविंदर यांना कायदेशीर मार्गाने १५ दिवसांत अमेरिकेला नेण्याचं त्यानं कबूल केलं. त्याबदल्यात त्यानं ४२ लाख रुपये एवढी मोठी रक्कमही घेतली. ही रक्कम देण्यासाठी सिंग कुटुंबानं त्यांच्याकडची एकमेव शेतजमीन भरमसाठ व्याजावर गहाण ठेवली.

“जवळपास ८ महिने माझे पती वेगवेगळ्या देशांमध्ये एखाद्या पटावरच्या प्याद्याप्रमाणे फिरतच होते. त्यांना कधी अमेरिकेला पोहोचताच आलं नाही”, अशी व्यथा कुलजिंदर कौर यांनी मांडली.

ट्रॅव्हल एजंटविरोधात तक्रार दाखल

हरविंदर सिंग यांची ४२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल एजंटविरोधात कुलजिंदर कौर यांनी तक्रार दाखल केली आहे. “आम्ही सारंकाही गमावून बसलो आहोत. आम्हाला फक्त आमच्या मुलांसाठी चांगलं भविष्य हवं होतं. पण आता आमच्यावर मोठं कर्ज झालं आहे”, असंही कुलजिंदर कौर यांनी सांगितलं. अगदी दोन महिन्यांपूर्वीदेखील हरविंदर कौर ग्वाटेमाला येथे असताना ट्रॅव्हल एजंटनं पैशांचा शेवटचा १० लाखांचा हप्ता घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us deported 104 illegal migrants from america indians c 17 globemaster plane pmw