US Authorities Arrest Indian Women in Mexico: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांच्या ‘घरवापसी’वर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे देशांतर्गत राजकीय वर्तुळात या परत पाठवणीविरोधात एकमत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अमेरिकेच्या या भूमिकेवर वेगवेगळ्या देशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच घेतलेल्या काही निर्णयांपैकी हा एक निर्णय ठरला. पण त्यामुळे भारत व अमेरिकेतली द्वीपक्षीय संबंध तणावपूर्ण ठरले आहेत. नुकतंच अमृतसरमध्ये अमेरिकेतील १०४ भारतीयांना घेऊन अमेरिकेचं C-17 Globemaster हे विमान उतरलं. त्यानंतर या भारतीयांच्या व्यथा आता समोर येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी पंजाबच्या अमृतसर येथील विमानतळावर उतरलेल्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानातून १०४ भारतीय उतरले. हे भारतीय अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत होते, असा दावा अमेरिकेनं केला आहे. त्यामुळे त्यांना भारतात परत पाठवण्यात आलं असून आता त्यांना जगभरातल्या कोणत्याही देशात वैध मार्गांनी जाता येणार नाही, असंही बजावण्यात आलं आहे. पण या १०४ भारतीयांपैकी अनेकजण ट्रॅव्हल एजंटच्या फसवणुकीमुळे तिथे पोहोचले होते तर एका तरुणीला लंडनचा अधिकृत व्हिसा असूनही मेक्सिको बॉर्डरवर पकडून भारतात परत पाठवण्यात आलं आहे.

पंजाबच्या ‘मुस्कान’ची व्यथा!

२१ वर्षीय मुस्कान खरंतर लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिच्याकडे तिथे शिक्षण घेण्याचा अधिकृत व्हिसादेखील आहे. पण केवळ सीमाभागात आढळली म्हणून तिला पकडून भारतात परत पाठवण्यात आल्याचं आता उघड झालं आहे. विशेष म्हणजे या पूर्ण प्रक्रियेदरम्यान तिला सांगितलंच गेलं नव्हतं की तिला भारतात परत पाठवलं जात आहे. त्यामुळे मुस्कानचा लंडनमधील सीयू कॉलेजमधला बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम अर्धवटच राहिला असून आता पुढच्या शिक्षणाचं काय? असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुस्कान शिक्षणाच्या व्हिसावर लंडनला गेली होती. तिच्यासह तिच्या काही सहकाऱ्यांना अमेरिकेच्या सीमेला लागून असणाऱ्या तिजुआना या मेक्सिकोतील शहरातून ताब्यात घेण्यात आलं. आणि तिथून त्या सगळ्यांना भारतात पाठवलं गेलं. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुस्काननं तिची ही व्यथा मांडली आहे.

“तिथल्या पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि…”

“अमेरिकेत बेकायदेशीररीत्या प्रवेश करण्याचा आमचा कोणताही विचार नव्हता. आम्ही मेक्सिकोत कायदेशीर मार्गांनीच प्रवास केला आहे. कुठली सीमा ओलांडून, भिंतींवरून उड्या मारून वगैरे आम्ही तिथे पोहोचलो नव्हतो. आम्ही तिजुआना सीमेवर असतानाच तिथल्या पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि अमेरिकेचे पोलीस तुम्हाला लवकरच घेऊन जातील, असं सांगितलं. माझ्याकडे तर आत्ताही लंडनचा अधिकृत व्हिसा आहे. मग मला भारतात परत का पाठवलं गेलं?” असा प्रश्न मुस्काननं उपस्थित केला आहे.

“त्यानंतर एक बस आली आणि आम्हाला डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिथे आम्हाला १० दिवस ठेवलं. त्यांनी आम्हाला काहीही विचारलं नाही. त्यांनी फक्त आमचे पासपोर्ट तपासले. आम्ही जवळपाच ४० जण होतो. आम्ही फक्त मेक्सिकोला गेलो होतो. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर तिजुआना बॉर्डरवर फिरायला गेले होते”, असं मुस्काननं सांगितलं आहे.

भारतात पाठवतोय हे सांगितलंच नाही!

दरम्यान, आपल्याला भारतात पाठवलं जात असल्याचं माहितीच नव्हतं, असं मुस्काननं सांगितलं आहे. “आम्हाला अमेरिकन पोलिसांनी अजिबात वाईट वागणूक दिली नाही. पण त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की आम्हाला भारतात नेलं जात आहे. आमचं विमान अमृतसरला उतरल्यानंतरच आम्हाला समजलं की आम्ही भारतात आलो आहोत. तेव्हा कुठे मी माझ्या पालकांना फोन करून भारतात आल्याचं कळवलं”, असं मुस्कान म्हणाली.

लाखोंचं कर्ज, शिक्षण कसं पूर्ण करायचं?

आता मुस्कान व तिच्या कुटुंबासमोर ‘पुढे काय?’ हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. “माझ्या कुटुंबानं मला लंडनमध्ये शिकायला पाठवण्यासाठी बँकेकडून १५ लाखांचं कर्ज आणि इतर आप्तस्वकीयांकडून काही रक्कम उधार घेतली होती. मला आशा आहे की सरकार माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा विचार करेल आणि मला लंडनला परतण्याची परवानगी देईल”, असं मुस्कान म्हणाली. “मला आता सांगितलं गेलंय की मी यूके किंवा इतर कुठेही प्रवास करू शकत नाही. माझा दोन वर्षांचा अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेला नाही. जर मी परत गेले नाही, तर माझं संपूर्ण करिअर विस्कटून जाईल”, अशा शब्दांत मुस्काननं भारत सरकारला कळकळीची विनंती केली आहे.