Operation DUNKI : अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना पुन्हा मायदेशात परत पाठवण्याची प्रक्रिया अमेरिका करत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवलं. मात्र, पाठवताना स्थलांतरितांच्या हाता-पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या असे आरोप झाले. यावरून भारतातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. दरम्यान, भारतातील नागरिकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवण्यात काही ट्रॅव्हल एजंट्स सहभाग असल्याचा आरोप होत आहे. यावरून आता पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाब सरकारने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परवाना नसलेल्या ट्रॅव्हल एजंट्सवरही पंजाब सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सांगितली जात आहे. आज ४० ट्रॅव्हल एजंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. हे ट्रॅव्हल एजंट्स लोकांना आमिष दाखवून ‘डंकी रूट’ने अमेरिकेत पाठवत असल्याचा आरोप आहे. ही कारवाई करण्यात आलेल्या ट्रॅव्हल एजंट्समध्ये नुकतेच अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या स्थलांतरितांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांच्या आदेशानुसार बनावट ट्रॅव्हल एजंट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि पनामा येथून हद्दपार केलेले ३०० हून अधिक भारतीय हद्दपारीच्या फ्लाइटने देशात परतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच अमृतसर पोलिसांनी शहरातील २७१ ट्रॅव्हल एजंट्सना नोटीस बजावली असून परवान्याचे नूतनीकरण करण्यास सांगितलं आहे. याबरोबरच उपविभागीय दंडाधिकारी यांना ट्रॅव्हल एजंट आणि इमिग्रेशन सल्लागारांच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ट्रॅव्हल एजंट्सच्या विरुद्ध कोणतीही तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या बरोबरोच ट्रॅव्हल एजंट्सना त्यांच्या कार्यालयात योग्य रेकॉर्ड ठेवण्याची आणि ते अपूर्ण कागदपत्रांसह काम करत नाहीत याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या ४८ तासांत पोलिसांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले असून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बरोबरच पंजाबमध्ये ट्रॅव्हल एजंट्सची कागदपत्रे कसून तपासली जात असून लोक बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी जनजागृती देखील करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.