अमेरिकेचे जेम्स रॉथमन व रँडी शेकमन तसेच जर्मनीत जन्मलेले संशोधक थॉमस सुडॉफ यांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. संप्रेरके, वितंचके व इतर महत्त्वाचे पदार्थ पेशींमध्ये कशा प्रकारे फिरतात, त्यांचे वहन कशाप्रकारे चालते यावरील संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक त्रिभागून देण्यात आले आहे. नोबेल समितीने म्हटले आहे की, पेशींमध्ये विशिष्ट पदार्थ (माल) विशिष्ट ठिकाणी कशा पद्धतीने पोहोचवला जातो, त्यावर या तिघांनी प्रकाश टाकला आहे. हे पदार्थ वाहून नेणाऱ्या कोशिकांमध्ये बिघाड झाल्यास आपल्याला मधुमेह, मेंदूरोग याशिवाय प्रतिकारशक्ती कमी होण्याला सामोरे जावे लागते.
रॉथमन हे ६२ वर्षांचे असून येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. शेकमन हे ६४ वर्षांचे आहेत. सुडॉफ हे ५७ वर्षांचे असून ते २००८ पासून स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन करीत आहेत. ‘ओ माय गॉड’ अशी पहिली प्रतिक्रिया शेकमन यांनी  व्यक्त केली. नोबेल समितीने म्हटले आहे की, शेकमन यांनी संप्रेरके, विकरे यांच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या जनुकांचा शोध लावला आहे. ही जनुके या रासायनिक घटकांच्या वाहतुकीत मोठी भूमिका पार पाडत असतात. रॉथमन यांनी काही प्रथिने ही झिपरप्रमाणे एखाद्या पार पटलास दोन्ही बाजूने चिकटून असतात, हे दाखवले. सुडॉफ यांनी असे दाखवून दिले की, कोशिका या अतिशय सावधगिरीने ही रसायने सोडत असतात, हे सुडॉफ यांनी दाखवून दिले आहे. पेशींमधील रसायनांचे पेशींच्या आत व बाहेर वहन कशाप्रकारे किती अचूकतेने होते याबाबतचे आपले ज्ञान वाढले आहे असे समितीने म्हटले आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेम्स रॉथमन
हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. २००२ मधील या संशोधनासाठी त्यांना अल्बर्ट लास्कर पुरस्कारही मिळाला.

रँडी शेकमन
शेकमन यांनी संप्रेरके, विकरे वहनासाठी आवश्यक असलेल्या जनुकांचा शोध लावला आहे.

थॉमस सुडॉफ
जर्मनीत जन्मलेले संशोधक सुडॉफ २००८ पासून स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन करीत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us duo german win nobel medicine prize