रॉयटर्स, वॉशिंग्टन, नवी दिल्ली : अमेरिकेकडून शस्त्रसज्ज ड्रोन खरेदी करण्याचा भारताचा प्रस्ताव दीर्घकाळ लाल फितीत अडकला असून हा खरेदी करार मार्गी लावण्यासाठी बायडेन प्रशासनाने भारत सरकारकडे आग्रह धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी अमेरिका दौरा लक्षात घेता ड्रोन विक्रीसाठी अमेरिकेचे सरकार सक्रिय झाल्याचे या घडामोडींशी संबंधित दोन जणांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने दीर्घकाळपासून अमेरिकेकडून मोठे शस्त्रसज्ज ड्रोन विकत घेण्यात स्वारस्य दाखविले आहे, पण नोकरशाहीतील अडथळय़ांमुळे सी गार्डियन ड्रोन खरेदीचा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला आहे. या ड्रोनची किंमत २०० ते ३०० कोटी डॉलरच्या घरात जाऊ शकते. ही विक्री मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २२ जूनच्या नियोजित व्हाईट हाऊस भेटीची प्रतीक्षा संबंधितांना आहे. मोदी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यापासूनच अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार खाते, पेंटागॉन आणि व्हाईट हाऊस यांनी भारताकडे ड्रोनखरेदी व्यवहाराला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

एमक्यू-९बी सी गार्डियन या शस्त्र वापराची क्षमता असलेल्या तीस ड्रोनच्या खरेदी व्यवहाराला भारताकडून अग्रक्रम मिळावा, असे सांगितले जात आहे. या ड्रोनची निर्मिती जनरल अ‍ॅटोमिक्स या कंपनीने केली आहे. मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे शस्त्रास्त्र आणि लष्करी वाहने यांच्या एकत्रित निर्मितीबाबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. याबाबत  व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. सध्या भारत आणि अमेरिका यांची अधिकृत अशी संरक्षणात्मक आघाडी नसली तरी, चीनला शह देण्यासाठी बायडेन यांनी भारताशी संरक्षण सहकार्य वाढविण्यास प्राधान्य दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us efforts to sell drones to india background to narendra modi upcoming visit ysh
Show comments